सोलापूर: आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम वाजत असताना सोलापूर जिल्ह्यात पूर्वी आठ जागा लढवणाऱ्या आणि कधी काळी चार आमदार असणाऱ्या शिवसेना ठाकरे गटाची यंदा मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. युतीमध्ये असताना जे मतदारसंघ सहजपणे वाट्याला येत होते तिथे आता आघाडीतील अन्य मित्र पक्ष दावेदार असल्याने ठाकरे गटाची अडचण झाली आहे. तर जे मतदारसंघ मिळण्याची शक्यता आहे, तेथील उमेदवार शरद पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या पक्षाला महाविकास आघाडीकडून एखाददुसरी तरी जागा सुटणार की, नाही याबाबत राजकीय वर्तुळात प्रश्नार्थक चर्चा ऐकायला मिळते.
१९८१-८२ नंतर राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे जाळे निर्माण झाले असताना इकडे सोलापूर जिल्ह्यातही कडव्या आणि निष्ठावंत शिवसैनिकांनी पक्षाचे जाळे विणले होते. प्रस्थापितांच्या विरोधात आवाज उठवताना काही शिवसैनिकांना प्राणास मुकावे लागले होते. १९९५ साली तत्कालीन शिवसेना-भाजप युतीच्या प्रभावामुळे त्यावेळच्या उत्तर सोलापूर राखीव जागेवर शिवसेनेचा पहिला आमदार उत्तमप्रकाश खंदारे यांच्या माध्यमातून निवडून आला. पुढे ते मंत्री झाले आणि नंतर त्यांनी सलग तीनवेळा आमदारकी सांभाळली होती. २००४ साली तर खंदारे यांच्यासह राजेंद्र राऊत (बार्शी), जयवंतराव जगताप (करमाळा) आणि रतिकांत पाटील (दक्षिण सोलापूर पोटनिवडणूक) असे चार आमदार निवडून आले होते. पक्षाच्या दृष्टीने जिल्ह्यातील ती सर्वोच्च कामगिरी होती. परंतु नंतर त्यापैकी आमदार राजेंद्र राऊत आणि आमदार जयवंतराव जगताप हे शिवसेनेतून बाहेर पडले. इकडे उत्तर सोलापूर राखीव मतदारसंघातून उत्तम प्रकाश खंदारे हे २००९ पर्यंत विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत होते.तथापि, पुढे जिल्ह्यात पक्षाच्या बांधणीकडे दुर्लक्ष होऊन गटबाजी वाढली. त्यानंतर कधीही सुधारणांच्या दृष्टीने सकारात्मक चित्र दिसले नाही.
हेही वाचा >>>उत्पन्न वाढवा, प्रोत्साहन भत्ता देऊ! आर्थिक कोंडीशी झुंजणाऱ्या एसटीकडून कर्मचाऱ्यांना आवाहन
पूर्वी शिवसेना-भाजप युती असताना जिल्ह्यात १३ विधानसभेच्या जागांपैकी सांगोला, करमाळा, माढा, बार्शी, दक्षिण सोलापूर, सोलापूर शहर दक्षिण, मंगळवेढा आणि मोहोळ अशा आठ जागा शिवसेनेच्या वाट्याला आल्या होत्या. तर भाजपकडे अक्कलकोट, सोलापूर शहर उत्तर, पंढरपूर, माळशिरस अशा मोजक्याच चार जागा होत्या. परंतु शिवसेनेला जम बसविता आला नाही. मागील २०१९ साली पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे ॲड. शहाजीबापू पाटील हे सांगोल्यातून शेकापचे दिवंगत ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. अनिकेत देशमुख यांचा थोडक्या मतांनी पराभव करून आमदार झाले खरे. नंतर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सामील झाले. बार्शीत पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री दिलीप सोपल हे मागील २०१९ साली शिवसेनेच्या चिन्हावर विधानसभा लढले आणि पराभूत झाले. गेल्या पाच वर्षांत सोपल शिवसेना ठाकरे गटात असूनही पूर्णतः अलिप्त आहेत. आगामी विधानसभेसाठी त्यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाची तुतारी हातात घेतली जाण्याची चर्चा ऐकायला मिळते.
हेही वाचा >>>महाराष्ट्र काँग्रेसमधील वाद आता दिल्ली दरबारी; पटोले, धानोरकर, वडेट्टीवारांना पक्षश्रेष्ठींकडून पाचारण
या पार्श्वभूमीवर सध्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा जिल्ह्यात एकही आमदार नाही. दुसरीकडे त्यांच्याकडे परंपरेने असलेल्या लढतीच्या जागाही निसटल्या. आता आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना महाविकास आघाडीत जागांसंबंधी समझोता होण्यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी सोलापुरात येऊन सोलापूर दक्षिणच्या जागेवर अमर रतिकांत पाटील यांची उमेदवारी अप्रत्यक्षपणे जाहीर करून टाकली आहे. या जागेवर मागील २०१४ आणि २०१९ पासून भाजपचे माजी मंत्री सुभाष देशमुख हे विधानसभेवर प्रतिनिधित्व करीत असताना येथे मतांच्या राजकारणात काँग्रेस पक्ष द्वितीय स्थानावर आहे. त्यामुळे यंदा ही जागा काँग्रेसकडून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला सहजासहजी सुटण्याची शक्यता दुर्मीळ असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते.