सोलापूर : चालू मे महिन्यात पहिल्या पंधरवड्यापर्यंत प्रचंड तापलेल्या सोलापुरात वळवाच्या पावसाने सध्या धुमाकूळ घातला आहे. मे महिन्यात जिल्ह्यात सरासरी २५.१ मिलीमीटर पाऊस पडत असताना जिल्ह्यात २२ दिवसांतच सरासरीच्या पाच पट जास्त १२०.६ मिली मीटर इतका पाऊस झाला आहे. दुसरीकडे वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. तर ५७ जनावरे दगावली. तसेच ८० घरांची पडझड झाली असून, ६४० हेक्टर क्षेत्रावरील शेती पिकांची हानी झाली आहे.

सोलापुरात गेले चार दिवस वळवाचा पाऊस धुमाकूळ घालत आहे. अनेक तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे करिष्मा विकास तांबे तर माढा येथे बाळासाहेब माणिक पाटील यांचा वीज अंगावर कोसळून मृत्यू झाला. अन्य काही भागातही वीज कोसळून १४ लहान आणि ४३ मोठी अशी मिळून एकूण ५७ जनावरे दगावली आहेत. याशिवाय ८० घरांची पडझड झाली आहे. वळिवाच्या पावसाने जोर धरल्यामुळे आतापर्यंत १४२ गावांमध्ये ६४० हेक्टर शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. यात बाधित शेतकऱ्यांची संख्या १५५७ एवढी आहे. ही प्राथमिक माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

वीज कोसळल्याने माढा तालुक्यात सर्वाधिक ११ जनावरे मृत्युमुखी पडली. करमाळ्यात ८, माळशिरसमध्ये ७, बार्शी व अक्कलकोटमध्ये प्रत्येकी ६, मोहोळ व सांगोल्यात प्रत्येकी ५, मंगळवेढ्यात ४, दक्षिण सोलापुरात ३ तर पंढरपूर आणि उत्तर सोलापुरात प्रत्येकी एका जनावराचा मृत्यू झाला. नुकसान झालेल्या शेती पिकामध्ये आंबा, केळी, डाळिंब आदी फळबागांचा समावेश आहे. काही भागांत वादळी वाऱ्यासह झालेल्या वळिवाच्या पावसात शेतातील ‘ग्रीन हाऊस’चे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. दुसरीकडे काही नद्यांसह नाले, ओढ्यांत पाणी प्रवाहित झाले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्यात आतापर्यंत पडलेल्या वळिवाच्या सरासरी १२०.८ मिमी इतकी असली तरी हा पाऊस सरासरीपेक्षा सुमारे पावणेपाच पट (४८० टक्के) अधिक आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत पावसाचा जोर मंदावला होता. बार्शी तालुक्यात १४.० तर करमाळा तालुक्यात ११.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसामध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल आठपट (एकूण १३२.८ मिमी, ८१४ टक्के) पाऊस माळशिरस तालुक्यात झाला आहे. दक्षिण सोलापूर-६०० टक्के, माढा-५४० टक्के, करमाळा-५०२ टक्के, उत्तर सोलापूर-५०० टक्के, बार्शी-४८९ टक्के, मंगळवेढा-४८० टक्के, सांगोला-४४८ टक्के, पंढरपूर-४२५ टक्के, अक्कलकोट-४११ टक्के याप्रमाणे वाढलेल्या पावसाचे प्रमाण आहे.