पंढरपूर : आषाढी यात्रेला पायी चालत पंढरीची वारी करणाऱ्या भाविकांचे सोलापूर जिल्ह्यातील, गावातील वेशीवर भव्य दिव्य स्वागत कमानी उभारून केले जाणार आहे. ग्रामविकास विभाग आणि पालकमंत्र्यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यात संतांच्या पालख्या पंढरपूरकडे जाताना ११ ठिकाणी कमानी उभारल्या आहेत. प्रत्येक कमानीवर वारकरी पताका, वीणा, पखवाज, विठ्ठल-रखुमाई मूर्तीसह रोषणाई केल्याची माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिली. विशेष म्हणजे या कमानीचे काम मुस्लिम बांधवांनी केले असून, अतिशय रेखीव व सुबक मूर्ती बनविल्या आहेत.
सोलापूर जिल्हा परिषद व ग्रामविकास विभागाने यंदा जिल्ह्याचा प्रवेश व पालखी पंढरपूरकडे जाताना वेशीवर अशा ११ ठिकाणी कमानी उभारल्या आहेत. प्रत्येक कमानीवर वेगळी संकल्पना साकारण्यात आली आहे. आकर्षक रोषणाई केल्याने भाविकांसह पंढरीकडे येणाऱ्यांचे स्वागत भक्तिमय वातावरणाने होणार आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या वेशीवर म्हणजेच धर्मपुरी येथील कमानीच्या वरील एका बाजूला विठ्ठल, तर दुसऱ्या बाजूला रखुमाईची मूर्ती आहे. तसेच कमानीवर वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्या भगवी पताका यांच्या सुबक व आकर्षक मूर्ती बसविल्या आहेत. तर एका बाजूला पंतप्रधान मोदी, तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वारकरी पेहरावामधील मूर्ती आहेत.
पंढरपूरच्या वेशीवर म्हणजेच वाखरी येथे उभारलेल्या कमानीवर दोन्ही बाजूंनी वरील भागाच्या मध्यभागी विठ्ठल आणि रखुमाईची भव्य मूर्ती, विठ्ठल मंदिराची प्रतिकृती कमानीच्या खालील बाजूस वारकरी खांद्यावर पताका घेऊन पायी चालत असलेल्या मूर्तीने लक्ष वेधून घेतले जाते.
मुस्लिम बांधवांची कारागिरी
या कमानीचे काम एका कंपनीला दिले आहे. मात्र काम करणारे कारागीर हे सर्व मुस्लिम बांधव आहेत. एक महिन्यापासून कमानीचे काम सुरू आहे. जवळपास ४० जणांचे हात याकामी लागले आहेत. विशेष म्हणजे या कारागिरांनी प्रयागराज, मथुरा आदी मोठ्या ठिकाणी अशा प्रकारच्या कमानी उभारल्या आहेत. वारकरी संप्रदायात भेदाभेद अमंगळ मानले जाते. त्याची प्रचिती मुस्लिम बांधवांनी आकार दिलेल्या या रेखीव मूर्ती पाहिल्यावर नक्कीच येईल.
