सोलापूर : सोलापुरातील सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी मठाचे संस्थापक ईश्वरानंद महास्वामी तथा आप्पाजी (वय ८८) यांचे अल्प आजाराने निधन झाले. हजारोंच्या संख्येने त्यांचा भक्त परिवार असून, यात अनेक राजकीय नेत्यांसह आजी माजी मंत्र्यांचाही समावेश आहे. गुरुवारी सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर मठाच्या परिसरात अंत्यसंस्कार करण्यात आले.
सायंकाळी उशिरापर्यंत ईश्वरानंद महास्वामीजींचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी बसवारूढ महास्वामींच्या मठात ठेवण्यात आले होते. अंत्यविधीप्रसंगी सुशीलकुमार शिंदे, आमदार सुभाष देशमुख, भाजपचे माजी महापौर किशोर देशपांडे यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक सुनील इंगळे, विवेकानंद केंद्राचे महाराष्ट्र व गोवा प्रांत प्रमुख अभय बापट आदी उपस्थित होते.
सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजींचा जन्म जत तालुक्यातील सिंदूर गावात सद्गुरू बसवारूढ महास्वामीजी आणि माता बंगारम्मा यांच्या पोटी झाला होता. वयाच्या बाराव्या वर्षी त्यांनी दीक्षा घेतली होती. वेद, उपनिषद, निजगुणांचे शडशास्र, न्यायघटित निश्चलानंदांचे साहित्य, नीतिशास्त्र अशा अनेक ग्रंथांचे अध्ययन आणि चिंतन करून त्यांनी आयुष्यभर असंख्य भक्तांना आध्यात्मिक मार्गाकडे जोडले होते. १९७४ साली मजरेवाडीत विमानतळाच्या पाठीमागे बसवारूढ महास्वामीजी मठाची स्थापना करून पुढे सर्व जातींच्या मुलांसाठी वेद अध्ययन गुरूकुलाचीही उभारणी महास्वामीजींनी केली होती.
सद्गुरू ईश्वरानंद महास्वामीजींच्या भक्त परिवारामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, भाजपचे नेते, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी, आंध्र प्रदेशाचे माजी मंत्री जी. जयराम, सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्यासह विविध राजकीय, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शिक्षण, वैद्यकीय अशा क्षेत्रांतील मंडळी बसवारूढ मठाचे साधक आणि भक्त आहेत. त्यांच्यावर आजारपणामुळे एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.