सोलापूर: जिल्ह्यातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि जनावरांच्या चाऱ्याची टंचाई लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातून उत्पादित होणारा सर्व प्रकारचा चारा आणि मुरघास इतर जिल्ह्यांत अथवा राज्यांत वाहतूक व विक्री करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्ह्यात तब्बल १८,२२,३५४ मोठे पशुधन असून, चाराटंचाईचा मोठा फटका या सर्व जनावरांना बसण्याची शक्यता आहे.
दुष्काळ परिस्थिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कुमार कार्तिकेयन यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश काढले आहेत. हा आदेश जून २०२७ अखेरपर्यंत लागू राहणार आहे. कृषी व पशुसंवर्धन विभागाने घेतलेल्या आढाव्यानुसार, सद्यस्थितीत उपलब्ध चारा हा जिल्ह्यातील पशुधनाला पुढील १२० दिवस म्हणजेच डिसेंबर २०२६ अखेरपर्यंतच पुरेल इतका मर्यादित आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणावर चारा बाहेर गेल्यास स्थानिक पातळीवर तीव्र टंचाई निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीतील चर्चा आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांच्या अहवालानुसार ही वाहतूकबंदी लागू करण्यात आली आहे.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश पोलीस प्रशासन, उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, आरटीओ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्यात आले आहेत. बेकायदेशीर वाहतूक किंवा साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांकडून पाहणी; चारा छावण्यांचे संकेत
मागील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील पिण्याचे पाणी व जनावरांच्या चाऱ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली होती. काही तालुक्यांमध्ये चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर असून, तेथे मागणीनुसार चारा छावण्या सुरू करण्याबाबत शासन सकारात्मक विचार करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
तालुकानिहाय एकूण पशुधन
तालुका एकूण पशुधन
सांगोला : ३,१५,१२०
माळशिरस : २,७९,४७१
पंढरपूर : २,०६,६८८
माढा : १,९१,४८१
मंगळवेढा : १,७२,०२७
मोहोळ : १,६४,५९०
करमाळा : १,४६,३१८
बार्शी : १,०१,९२६
अक्कलकोट : ९८,९१६
दक्षिण सोलापूर : ९५,८६३
उत्तर सोलापूर : ४९,९५४
जिल्ह्यातील एकूण पशुधन : १८,२२,३५४
