सोलापूर : सोलापुरातील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्रभारी प्राचार्य अमर जाधव यांची बदली तत्काळ रद्द करण्याची मागणी करीत संस्थेतील विद्यार्थिनींनी संस्थेसमोर निदर्शने केली. या निमित्ताने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये अवघ्या दहा टक्के प्रशिक्षकांवर कारभार चालत असल्याचे केविलवाणे चित्र दिसून येते.
एकीकडे पुरेशा प्रशिक्षकांअभावी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले जात असताना, दुसरीकडे एकाच वेळी चार-चार औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रभारी म्हणून प्रतिकूल परिस्थितीतही कामकाज करणाऱ्या प्राचार्याची बदली करण्यात आली आहे. त्यामुळे अशा औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची आहे त्या परिस्थितीत होत असलेली प्रगतीची वाट रोखण्याचा प्रयत्न शासकीय अनास्थेमुळे होत आहे, अशी जळजळीत प्रतिक्रिया आंदोलक विद्यार्थिनींनी व्यक्त केली आहे.
शहरातील लेडी डफरीन (इंदिरा गांधी) चौकात मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे प्रभारी प्राचार्य अमर जाधव यांची बदली झाली आहे. या बदलीच्या विरोधात संस्थेतील सर्व विद्यार्थिनी एकवटल्या आहेत. प्राचार्य जाधव यांच्याकडे मूळ पिंपरी-चिंचवड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य पदाची जबाबदारी आहे. परंतु त्यांना सोलापुरात मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह अक्कलकोट व मंद्रूप (ता. दक्षिण सोलापूर) या दोन औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तसेच नॉर्थकोट तांत्रिक शिक्षण प्रशालेच्या प्राचार्य पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला आहे. मुलींच्या संस्थेत ३२५ विद्यार्थिनी, तर मंद्रूपमध्ये २१० आणि अक्कलकोटमधील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ३५० विद्यार्थी औद्योगिक प्रशिक्षण घेतात. परंतु यांपैकी कोठेही पूर्णवेळ प्राचार्य नाही. आणखी धक्कादायक बाब म्हणजे मुलींच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण २० मंजूर प्रशिक्षकांच्या पदांपैकी जेमतेम दोनच पदांवर संस्थेचा डोलारा कसाबसा उभा आहे, अशी निराशाजनक प्रतिकूल परिस्थिती विद्यार्थिनींनी प्रसारमाध्यमांकडे मांडली.
सुहासिनी राजेंद्र भंडारे या विद्यार्थिनीने प्रातिनिधिक स्वरूपात संस्थेतील प्रशिक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळच नसेल, तर आम्ही शिकणार कशा, असा सवाल उपस्थित केला. यातही संस्थेत प्रभारी प्राचार्य अमर जाधव यांनी अडचणींना तोंड देत सुधारणा घडवून आणल्या. पाणी, स्वच्छतागृहाची सोय करून दिली. विवाहित मुलींना सवलत दिली. प्रशिक्षणाच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न केले. परंतु आता त्यांचीही बदली झाली आहे. त्यामुळे आम्हा विद्यार्थिनींवर अन्याय झाला आहे. जाधव यांची इंदापुरात झालेली बदली रद्द न झाल्यास आम्ही सर्व ‘सावित्रीच्या लेकी’ शांत बसणार नाही, असा इशारावजा निर्धार बोलून दाखवला आहे.
(प्रशासकीय कारणास्तव बदली)
सोलापूरच्या मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसह चार ठिकाणी प्राचार्यपदाचा अतिरिक्त भार सांभाळत होतो. आता प्रशासकीय कारणास्तव बदली झाली आहे. माझ्या जागी सातारा येथून मनीष मोरे यांची नेमणूक झाली असली, तरी त्यांनी पदभार घेतलेला नाही.अमर जाधव, प्रभारी प्राचार्य, मुलींची शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर