पंढरपूर : ‘मुलानो शांत बसा, हाताची घडी, तोंडावर बोट !’ शाळेत शिक्षकांच्या अशा सूचना आपण नेहमीच ऐकतो. पण अशीच सूचना मात्र विनोदाने सोलापूरचे पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली. तालुक्यातील तुंगत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पहिल्या दिवसाचा शुभारंभ गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. शिक्षणासाठी पंतप्रधानांपासून ते थेट तुमच्या सरपंचापर्यंत विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले.
हा दिवस विविध उपक्रमांना साजरा झाला. अनेक ठिकाणी आकर्षक फुलांची सजावट केली होती. विद्यार्थ्यांना सजवलेल्या वाहनातून आणण्यात आले. काही ठिकाणी फुले देवून त्यांचे स्वागत केले. तालुक्यातील तुंगत येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. एरवी राजकीय पुढाऱ्यांच्या हस्ते शालेय कार्यक्रम हा विद्यार्थ्यांसाठी तसा कंटाळवाणा असतो. मात्र, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी या कार्यक्रमातून गावकऱ्यांचीही मने जिंकून घेतली.
तुंगत येथील शाळेतील विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर गोरे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. पुढची पिढी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, हा शासनाचा संकल्प आहे. वाडीवस्तीतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे भाषण सुरू असताना काही विद्यार्थी चूळबुळ करू लागले. लगेच पालकमंत्री गोरे म्हणाले ‘मुलानो शांत बसा, हाताची घडी, तोंडावर बोट !’ आणि एकदम शांतता झाली. मात्र, लगेच गोरे यांनी मी तुम्हाला शिक्षा करणार नाही, असे म्हटल्यावर विद्यार्थ्यांचे चेहऱ्यावर हास्य उमटले. ग्रामीण भागात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या व्यथा मी जाणतो. तुमचे काही प्रश्न, समस्या असतील तर निवारण केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. एरवी राजकीय टोलेबाजी, टीका करणारे राजकारणी गोरे यांनी शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची मने जिंकली.