एजाज हुसेन मुजावर

सोलापूरच्या यंत्रमाग, विडी आणि कापड उद्योगाला करोनाचा फटका बसला आहे. या तिन्ही उद्योगांच्या माध्यमातून सुमारे सव्वा लाख कामगारांना रोजगार मिळतो. आधीच नोटाबंदी, जीएसटीमुळे मंदीचा फटका बसला असताना आता करोना भयसंकटाची भर पडली आहे. सद्य:स्थितीत या तिन्ही उद्योगांमध्ये ३० ते ५० टक्के उत्पादन बंदच असल्यामुळे आर्थिक संकट चिंतेचा विषय ठरला आहे. भविष्यकाळात त्याचे परिणाम अधिक भोगावे लागण्याची भीती व्यक्त केली जाते.

सोलापूरच्या पूर्व भागात बहुसंख्य तेलुगू भाषकांशी संबंधित असलेले यंत्रमाग आणि विडी उद्योगातील दैनंदिन उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी तर कापड उद्योगातील उत्पादन ५० टक्के घटले आहे. टाळेबंदी संपून दोन-तीन महिन्यांचा कालावधी लोटला तरी या तिन्ही उद्योगांना संकटातून बाहेर पडणे कठीण झाले आहे.

हजारोंना रोजगार

येथील यंत्रमागांची संख्या सुमारे १५ हजारांपर्यंत असून त्यात सुमारे ४० हजार कामगारांना रोजगार मिळतो. अधिक रोजगार देणारा म्हणून विडी उद्योग ओळखला जातो. सोलापुरात १५ विडी कारखान्यांच्या माध्यमातून सुमारे ७० हजार महिला कामगारांची रोजीरोटी चालते. कापड उद्योग वाढत असून त्यात सुमारे २५ हजार कामगारांना रोजगार मिळतो. एकेकाळी गिरणगाव म्हणून ओळखल्या गेलेल्या सोलापुरात कापड व सूतगिरण्या बंद पडल्यानंतर पर्यायी उद्योग व्यवसाय उभारू शकले नाहीत. प्राप्त परिस्थितीत सोलापूरची आर्थिक भिस्त यंत्रमाग, विडी आणि कापड उद्योगांवर असतानाच करोना भयसंकटामुळे या उद्योगांची विस्कटलेली घडी सावरली नाही. त्यात नवनव्या प्रश्नांची भर पडत आहे. या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रामाणिकपणे धडपड करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा अभावच दिसतो आहे.

गेल्या पाच वर्षांत तर नोटाबंदी व त्यानंतर वस्तू व सेवा कराने येथील यंत्रमाग उद्योगाचे कंबरडे मोडले असतानाच आता करोनाची  भर पडली आहे. करोनाचा मोठा फटका प्रामुख्याने शहराच्या पूर्व भागाला बसला आहे. तेथील, दाटीवाटीच्या झोपडपट्टय़ांमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत गेला तशी रुग्णसंख्या वाढत गेली. अद्याप ४० ते ५० टक्के यंत्रमाग बंदच आहेत. आपलेच सहकारी कामगार करोनाचे बळी ठरल्यामुळे बहुसंख्य कामगारांच्या मनात करोनाची भीती अजूनही दूर झाली नाही. दुसरीकडे यंत्रमाग उद्योजकांची आर्थिक परिस्थिती अस्वस्थता निर्माण करणारी आहे.

वीज दरवाढ असह्य़

लग्नसराईसह अन्य हंगाम वाया गेला आहे. आता दसरा-दिवाळीवर भिस्त आहे. सोलापुरात पर्यटन व्यवसाय वाढत असल्यामुळे त्या जोरावर टर्किश टॉवेल व चादरींच्या खरेदीसाठी पर्यटक मंडळी आवर्जून येतात. परंतु करोनामुळे एकूण पर्यटन व्यवसायच थंडावल्यामुळे त्याचाही मोठा फटका यंत्रमाग उद्योगाला बसला आहे. यातच वीज दरवाढ असह्य़ झाली आहे. वीजबिलांचा वाढीव भार सोसणे अशक्य असल्याचे सोलापूर जिल्हा यंत्रमागधारक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांचे म्हणणे आहे. सरकारने जाहीर केलेल्या आत्मनिर्भरसारख्या योजना यंत्रमाग उद्योजकांसाठी केवळ कागदोपत्री ठरू नयेत तर त्यांचा खऱ्या अर्थाने लाभ मिळावा. अनेक यंत्रमाग उद्योजक विविध बँकांसह अन्य वित्तीय संस्थांच्या कर्ज थकबाकीदार आहेत. आज त्यांची आर्थिक पत राहिली नाही. त्यांच्यासाठी सरकारने किमान वाढीव व्याजदरात तरी सवलत देणे अपेक्षित आहे. शेतकऱ्यांच्या धर्तीवर किमान व्याजदराने यंत्रमाग उद्योजकांना कर्ज मिळावे, अशीही मागणी यंत्रमागधारक संघाने केली आहे.

उत्पादनात घट

यंत्रमागाप्रमाणेच विडी उद्योगाची परिस्थिती म्हणता येईल. प्रामुख्याने ९५ टक्के महिलांना रोजगार देणाऱ्या विडी उद्योगांमध्ये सोलापुरात सध्या २५ ते ३० टक्के उत्पादन घटले आहे. सोलापूरची विडी महाराष्ट्रात विदर्भ, खानदेश, मराठवाडय़ासह शेजारचे कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, हरियाणा आदी प्रांतांमध्ये पाठवली जाते. या व्यवसायात विश्वासाने बराच माल उधारीने पाठवला जातो. दोन महिन्यांनी उधारी वसूल होते. परंतु टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ‘विडी’चा हिशेबच बिघडला आहे. पूर्वीची उधारी येणे प्रलंबित असताना नव्याने उत्पादित विडय़ांची मागणी घटली आहे. तरीही जिद्द आणि उद्याच्या आशेच्या बळावर विडी उत्पादन सुरू आहे. पूर्वी दररोज साडेतीन कोटी विडय़ांचे उत्पादन व्हायचे. आता त्यात २५ ते ३० टक्के घट झाली आहे. त्याचा फटका कामगारांच्या रोजगाराला बसला आहे. या प्रश्नावर सोलापूर विडी उद्योग संघाचे सचिव बाळासाहेब जगदाळे हे आशावादी आहेत.

यंत्रमाग व विडी उद्योगाप्रमाणेच सोलापूरच्या वस्त्रोद्योग उद्योगाला अद्याप सावरता आले नाही. येथे सुमारे पाचशे लहानमोठे गारमेंट उद्योग आहेत. मागील पाच वर्षांत मिळालेल्या प्रोत्साहनामुळे हा उद्योग स्थिरावत असतानाच करोना तथा टाळेबंदीमुळे या उद्योगाची मोठी पीछेहाट झाली आहे.