पत्नी करोनाबाधित झाल्याचे कळताच चिंताग्रस्त वृध्द पतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे ही धक्कादायक व हृदयद्रावक घटना घडली.

बब्रुवान गणपत काळे (वय ७५) असे आत्महत्या करून स्वतःची जीवनयात्रा संपविलेल्या वृध्दाचे नाव आहे. सोलापूर-तुळजापूर रस्त्यावर, सोलापूरपासून २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या कासेगावात करोना विषाणूचा फैलाव वाढला आहे. त्यामुळे प्रशासनाने जलद चाचण्यांद्वारे (ॲन्टिजेन टेस्ट) करोना साखळी तोडण्याच्या हेतूने गावातील संशयित व्यक्तींची तपासणी सुरू केली आहे. यात मृत बब्रुवान यांच्या पत्नीचीही करोना चाचणी झाली, ज्यामध्ये त्यांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून आले. त्यांची रवानगी गावातील विलगीकरण कक्षात झाली असता, इकडे घरात वृध्द पतीला पत्नीच्या तब्येतीची चिंता अस्वस्थ करू लागली. त्यांनी स्वतःचीही करोना चाचणी करून घेण्याचे ठरविले होते. परंतु अस्वस्थ मानसिकतेमुळे त्यांनी काही वेळातच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

मृत बब्रुवान यांना दोन मुले व एक मुलगी असून तिघेही विवाहित आहेत. मुलगी पुण्यात राहते. तर दोन्ही मुले गावातच शेतीची कामे करतात. बब्रुवान हे आपल्या पत्नीसह मुलांपासून विभक्त होऊन स्वतंत्र घरात राहात होते. त्यांना गुडघेदुखीचाही त्रास होता. दरम्यान, बब्रुवान यांचा मृतदेह सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रूग्णालयात न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठविण्यात आला असता, रूग्णालय प्रशासनाने मृत बब्रुवान यांच्या पत्नी करोनाबाधित असल्यामुळे त्यांनाही करोनाची बाधा झाल्याचे गृहीत धरत, त्यानुसार सरकारी निकषाप्रमाणे महापालिकेमार्फत मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याचे ठरविले आहे.