पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण काढणाऱ्या एसआरपीएफ जवानाची समजूत काढण्यासाठी आलेल्या मेव्हण्यासह इतरांवर एसआरपीएफ जवानाने गोळीबार केला. यात एकाचा मृत्यू झाला, तर दोघेजण जखमी झाले. बार्शी तालुक्यातील भातंबरे येथे रात्री पावणे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून त्याच्याकडून पिस्तूल व २६ जिवंत काडतुसे हस्तगत केली.

गोरोबा महात्मे (वय ३८, रा. भातंबरे) असे अटक झालेल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या जवानाचे नाव आहे. त्याने केलेल्या गोळीबारात नितीन बाबुराव भोसकर (वय ३०, रा. सापनाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांचा मृत्यू झाला. तर गोरोबाचा मेव्हणा अमर जालिंदर काकडे व त्याचा मित्र काशीनाथ विश्वनाथ काळे हे जखमी झाले आहेत. जखमींवर सोलापूरच्या एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

यासंदर्भात जखमी काशीनाथ काळे (वय ३५) याने दिलेल्या फिर्यादीनुसार वैराग पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. मुंबईत एसआरपीएफमध्ये जवान असलेला गोरोबा महात्मे हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडणे करायचा. तो मागील काही दिवसांपूर्वी आपल्या गावी भातंबरे येथे आला होता, त्यानंतर पती-पत्नीचे भांडण झाले. तेव्हा गोरोबाचा मेव्हणा त्याच्या मित्र व नातलगांसह सापनाई (ता. कळंब) येथून आला. भांडण अधिकच वाढले असता रागाच्या भरात गोरोबा महात्मे याने स्वतःजवळील सरकारी पिस्तुलाने गोळीबार केला. यात मेव्हणा अमर काकडेसोबत आलेल्या नितीन भोसकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मेव्हणा अमर काकडे व काशीनाथ काळे हे दोघे जखमी झाले. गोरोबाने केलेल्या गोळीबारात अन्य एकजण सुदैवाने बचावला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक विनय बहीर हे पुढील तपास करीत आहेत.