सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार हे रविवारी पक्षाच्या मेळाव्यासाठी बार्शीकडे जात असताना वाटेत कुर्डूवाडीजवळ मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची मोटार अडवून मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर त्यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलकांशी संवाद साधला. मात्र त्यातून समाधान झाले नाही. यावेळी कोणताही गोंधळ झाला नाही. नंतर पवार हे पुढे रवाना झाले. रविवारी सकाळी बार्शी येथे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मेळावा आणि पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व शेजारच्या धाराशिवचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचा सत्कार आयोजिला होता. त्यासाठी शरद पवार हे बारामतीहून निघाले होते. कुर्डूवाडीमार्गे बार्शीकडे जाताना वाटेत मराठा आरक्षण आंदोलकांनी त्यांची मोटार अडविली आणि मराठा आरक्षणाबद्दल भूमिका विचारली. त्यावेळी पवार यांनी मोटारीच्या दरवाजाची काच खाली करून आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या. मराठा आरक्षणाला आपला पूर्वीपासूनच पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु समाधान न झालेल्या मराठा आंदोलकांनी, तुम्ही मराठा आरक्षणाला फक्त पाठिंबा देता, त्यावर प्रत्यक्ष सक्रिय भूमिका का घेत नाही, असा सवाल केला. यावेळी मराठा आंदोलकांनी मराठा आरक्षणाच्या घोषणा दिल्या. हेही वाचा - राज्यसभेची एक जागा अजित पवार गटाला, देवेंद्र फडणवीस यांचे विधान; कुणाला मिळणार उमेदवारी? हेही वाचा - ‘इन्फोसिस’ला साताऱ्यात आयटी केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव, उदयनराजे भोसलेंची डॉ. सुधा मूर्तींकडे मागणी दरम्यान, पवार यांच्या वाहनांचा ताफा तेथून पुढे बार्शीकडे रवाना झाला. त्यावेळी अन्य कोणताही गोंधळ झाला नाही. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी राज्यात आंदोलन तीव्र केल्यानंतर मंत्री व आमदार-खासदारांची वाहने अडविण्याचे प्रकार घडत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोटारीवर बीड जिल्ह्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी सुपाऱ्या भिरकावल्याचा प्रकार घडला. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात कुर्डूवाडीजवळ मराठा आरक्षण आंदोलकांनी शरद पवार यांची मोटार अडवून जाब विचारल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला आहे.