सोलापूर शहर व जिल्ह्यात करोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप आटोक्यात येत नसताना, दुसरीकडे करोनाबाधित रूग्णांच्या थेट संपर्कात आल्यामुळे आणि करोनाची बाधा होण्याच्या संशयामुळे संस्थात्मक विलगीकरणात पाठविल्या जाणाऱ्या रूग्णांच्या संख्येत मागील महिनाभरात झपाट्याने वाढली आहे. यामध्ये शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील व्यक्तींची संख्या अधिक आहे.

सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून आतापर्यंत संस्थात्मक विलगीकरण कक्षांमध्ये ठेवण्यात आलेल्या संशयित रूग्णांची एकूण संख्या ४२ हजार ८७७ एवढी होती. त्यापैकी ३८ हजार ७४९ संशयित रूग्णांचा विलगीकरणातील १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असून, अद्याप २ हजार ६९३ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. यात शहर आणि ग्रामीणची वर्गवारी अशी की, शहरात संस्थात्मक विलगीकरणातील एकूण १२ हजार १७४ पैकी १० हजार २९७ व्यक्तींचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. सध्या केवळ ४६५ संशयित रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर २३ संशयित रूग्ण अद्याप गृह विलगीकरणात (होम आयसोलेशन) आहेत. जिल्हा ग्रामीणमध्ये ३० हजार ७०३ संशयित रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात होत्या. त्यापैकी २८ हजार ४७५ रूग्णांचा १४ दिवसांचा विलगीकरणातील कालावधी पूर्ण झाला असून सध्या २ हजार २२८ रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

शहरात ३० जूनपर्यंत ७ हजार ८७६ संशयित रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात होते. महिनाभारात त्यात ४ हजार ९९८ रूग्णांची वाढ झाली. तर जिल्हा ग्रामीणमध्ये ३० जूनपर्यंत जेमतेम ६ हजार ८१८ संशयित रूग्ण संस्थात्मक विलगीकरणात होते. परंतु मागील महिनाभरात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड प्रमाणात वाढल्यामुळे परिणामी संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणाऱ्या संशयित रूग्णांमध्ये तब्बल २३ हजार ९८५ ची भर पडल्याचे दिसून येते.

दरम्यान, शहर व जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबाधित रूग्णसंख्या नऊ हजारांचा टप्पा पार करून पुढे गेली आहे. आजअखेर नऊ हजार ८९ एवढी बाधित रूग्णसंख्या आहे. तर मृतांचा आकडा ४५६ झाला आहे. दुसरीकडे करोनामुक्त होण्याचे प्रमाण ६०.५१ टक्के आहे. यात शहरातील बाधित संख्या ५ हजार १४६ तर ग्रामीणमधील संख्या ३ हजार ९४३ आहे. शहरातील मृत्युची संख्या ३६७ तर ग्रामीणमधील मृतांची संख्या ११२ वर पोहोचली आहे. शहरातील करोनामुक्त रूग्णसंख्या ३ हजार २५२ म्हणजे ६३.१९ टक्के आहे. मृतांचे प्रमाण अद्यापि ७ टक्क्यांहून अधिक आहे.

सोमवारी दिवसभरात शहरात ७११ चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाले असता, त्यात ४२ बाधित रूग्ण सापडले. तर दोन रूग्णांना प्राण गमवावे लागले. काल रविवारी रात्री जिल्हा ग्रामीणमध्ये १३१ बाधित रूग्ण सापडले होते. तर चार जणांचा मृत्यू झाला होता.