सोलापूर: यंदा मान्सूनने वेळेत आणि समाधानकारक हजेरी न लावल्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील बियाणे विक्रेत्यांसह शेतकर्यांच्या चिंतेत प्रचंड वाढ झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे बाजारात कोट्यवधी रुपयांचे बियाणे आणि खतांचा साठा दुकानांमध्येच पडून आहे. मागील वर्षीच्या मागणीचा अंदाज घेऊन बियाणे विक्रेत्यांनी खरिपासाठी मोठ्या प्रमाणावर साठा उपलब्ध करून ठेवला होता. मात्र, पावसाअभावी शेतकरी खरेदीसाठी पुढे येत नसल्याने व्यापारी आता आर्थिक संकटात सापडले आहेत.

सोलापूर शहर व जिल्ह्यांमध्ये ३,८०० परवानाधारक बीयाणे विक्रेते आहेत. तर, रासायनिक खताचे ३,३०० व किटकनाशक व औषधी विक्रेते २,८०० आहेत. सोलापूर जिल्ह्यात यंदाच्या (२०२६) खरीप पिकाचे सरासरी क्षेत्र ३, ३७, ९६८ हेक्टर क्षेत्रापैकी फक्त ९७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. खरीपामध्ये सोलापूरात उडीद, मूग, तूर व सोयाबीण या पिकांचा सर्वांधिक पेरा असतो. पण, यंदा पावसाने ओढ दिल्याने उडीदपिकाचे सरासरी ५८ हजार हेक्टर पैकी फक्त ११ हजार हेक्टवरच पेरा झाला. तुरीच्या ८६,५८३ हेक्टर पैकी फक्त १४ हजार हेक्टवर पेरा झाला.

सर्वाधिक पेरा सोबायीनचा झाला असून सरासरी ८१ हजार हेक्टरपैकी ४५ हजार २५० हेक्टरवर पेरा झाला आहे. विशेष म्हणजे, झालेली ही अल्प पेरणी ज्यांच्याकडे पाण्याचा पर्यायी स्त्रोत उपलब्ध आहेत, त्याच शेतकर्यानी केली आहे. काही भागांत आधी पेरणी झालेली पिके पाण्याअभावी कोमजू लागली आहेत.

“सोलापूर शहर आणि परिसरात उडीद पिकाची पेरणी सर्वाधिक होते. दरवर्षी बाजारात उडीद बियाण्याचा मोठा तुटवडा जाणवतो. हाच अनुभव लक्षात घेऊन यंदा मी स्वतः ‘निर्मला कंपनी’चे २०० पोती उडीद बियाणे आगाऊ आणून ठेवले होते. परंतु, पाऊस नसल्याने आजपर्यंत त्यापैकी २० पोती देखील विकली गेलेली नाहीत. बाजारात बियाणे पडून राहिल्याने मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.”

  • रेवणसिद्ध सिंदखेडे, बियाणे व्यापारी (मजरेवाडी, सोलापूर)

मागीलवर्षी प्रमाणे यंदाही खरीपाची चांगली पेरणी होईल, या अपेक्षेने शेतकर्यानी तयारी केली होती. पण, एलनिनोचा प्रभाव सोलापूर जिल्ह्यात अधिक जाणवतोय. चांगला पाऊस, पर्यायी पाण्याची सोय उपलब्ध असल्याशिवाय खरीपाचा पेरा करून नका, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. बियाणे मुबलक आहेत. आता, रासायनिक खताचा साठा उपलब्ध असल्याने पुढील हंगाम, इतर बागायत पिकांसाठी टंचाई भासणार नाही.

  • शुक्राचार्य भोसले, जिल्हा कृषी अधीक्षक, सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील पावसाची स्थिती

  • वार्षिक सरासरी पाऊस: ४८१.१ मिलीमीटर
  • आत्तापर्यंत पडलेला पाऊस: १२३.५ मिलीमीटर
  • मागील वर्षीचा पाऊस (सन २०२५): ८८५ मिलीमीटर