सोलापुरात जोरदार पावसामुळे दुष्काळ मिटण्याची आशा पल्लवित

दोन महिन्यांपासून प्रखर उष्णतेमुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.

माळशिरस भागात अकलूज व अन्य परिसरात वादळी वाऱ्यांमुळे घरांचे नुकसान झाले. त्याचे हे दृश्य. (छाया-गणेश जामदार, अकलूज)

खरीप पिकांच्या लागवडीची तयारी वेगात
सोलापूर जिल्ह्य़ात गेल्या सलग पाच दिवसांपासून रोहिणी नक्षत्राचा पाऊस पडत असून काल शनिवारी रात्री उशिरापर्यंत सर्वदूर कमी-जास्त प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे दुष्काळाच्या संकटापासुन मुक्त होण्याची शेतकऱ्यांची आशा पल्लवित झाली आहे. पावसामुळे शेतकरीवर्ग शेतात खरीप हंगामात पिकांच्या लागवडीच्या तयारीला लागला आहे. दुसरीकडे तापमानही ३२ अंशांपर्यंत खाली आल्याने गेल्या दोन महिन्यांपासून प्रखर उष्णतेमुळे हैराण झालेल्या सोलापूरकरांना चांगलाच दिलासा मिळाला आहे.
शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेपर्यंत जिल्ह्य़ात २२.४४ मिली मीटर सरासरीने एकूण २४६.८४ मिमी पाऊस पडला. १ जून ते ४ जूनपर्यंत जिल्ह्य़ात एकूण १९०.३५ मिमी पाऊस पडला होता. त्यानंतर पाचव्या दिवशी जोमदार पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांची तयारी लगबगीने सुरू झाल्याचे ग्रामीण भागात दिसून येते. रविवारी सकाळी आठपर्यंत २४ तासात सर्वाधिक ४७.६० मिमी पाऊस माळशिरस तालुक्यात पडला, तर माढा तालुक्यामध्ये ३०.६३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. अन्य तालुक्यांमध्ये झालेला पाऊस याप्रमाणे : उत्तर सोलापूर-२०.४०, दक्षिण सोलापूर-१९.७६, बार्शी-१४.८०, करमाळा-२४.७५, पंढरपूर-२१.१६, सांगोला-२८.७८, मंगळवेढा-१९, अक्कलकोट-१०.७८ व मोहोळ-८.३८. वादळी वाऱ्यांसह जोमदार पावसाने हजेरी लावताना काही तालुक्यांमध्ये घरांवरील पत्र्यांचे छत उडून गेल्याचे प्रकार घडले. माळशिरस तालुक्यात अकलूजसह आसपासच्या भागात घरांचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या. माढा परिसरातही काही गावांमध्ये कमी-जास्त नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Solapur likely free from the drought crisis due to heavy rains

ताज्या बातम्या