सोलापूर : बहुचर्चेत आणि लक्षवेधी ठरलेल्या सोलापूर राखीव लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे आणि भाजपचे आमदार राम सातपुते यांच्यातील तुल्यबळ चुरशीच्या लढतीत कोण बाजी मारणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मतमोजणीस तीन दिवस उरले असताना निकालावरून सर्वांची धाकधूक वाढली आहे.

यापूर्वी २०१४ आणि २०१९ साली सलग दोनवेळा सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपचे आमदार राम सातपुते यांना कडवे आव्हान दिले आहे. यात कमालीची चुरस दिसून आल्यामुळे शेवटी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याची उत्कंठापूर्वक कट्ट्या-कट्ट्यांवर, दुकानांच्या फळ्यांवर, मित्र परिवार व नातेवाईकांसह कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

हेही वाचा – ‘जयंत पाटील काँग्रेसमध्ये आले तर घेणार का?’ नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले, “परिवर्तनाची लाट…”

या मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच विधानसभा क्षेत्र महायुतीकडे असताना त्याचा लाभ कितपत भाजपचे सातपुते यांना मिळतो आणि ते बाजी मारतात, यावर त्यांच्या विजयाची गणिते अवलंबून असताना त्यापैकी सोलापूर शहर उत्तर आणि अक्कलकोट या दोन विधानसभा क्षेत्रांतून मागील २०१९ सालच्या लोकसभा लढतीच्या तुलनेत किती मताधिक्य घेणार, याचीही चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे महायुतीकडे असूनही मोहोळ आणि पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा क्षेत्र, तेथील बहुसंख्य मराठा मतांचा कल पाहता आमदार प्रणिती शिंदे यांना खरोखर तारणार का, याबाबत काँग्रेसच्या गोटातही कमालीची उत्सुकता वाढली आहे. सुरुवातीला लाख-दोन लाखांचे मताधिक्य मिळविण्याचे केले गेलेले दावे आता २५ हजार ते ५० हजारांच्या मताधिक्यावर स्थिरावले आहेत.

या लढतीसाठी परस्परविरोधी विजयाचे दावे केले असले तरी त्यात जातींची समीकरणे मांडली जात असल्यामुळे कोणती जात कोणाला आधार देणार आणि कोणाला हात दाखविणार, यावरून पैजा लागल्या आहे.

हेही वाचा – अमोल मिटकरींचं उत्तर, “मेधा कुलकर्णींचं वक्तव्य संविधान बदलांच्या चर्चांना बळ देणारं, कारण…”

अनेक वळणे घेत लढली गेलेल्या या निवडणुकीत चुरस असली तरी सुरुवातीला भाजपच्या विरोधात असलेला मतदारांचा अंतःप्रवाह नंतर शेवटच्या टप्प्यात वळविण्यात भाजपने केलेली नियोजनबद्ध धडपड किती यशस्वी होणार, याचीही रंगतदार चर्चा जागोजागी ऐकायला मिळत आहे.