सोलापूर: “नदी आणि कालव्यांमध्ये मुबलक पाणी वाहत असताना केवळ महावितरणच्या नाकर्तेपणामुळे शेतकरी डोळ्यांदेखत पिकं जळताना हताशपणे पाहत आहेत. हे राज्य सरकार, शेतकऱ्यांचा अंत पाहतंय का?” असा संतप्त सवाल करत खासदार प्रणिती शिंदे यांनी सोमवारी महावितरण कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. पाण्याअभावी करपलेल्या सोयाबीनच्या पिकांचे अवशेष अधीक्षक अभियंत्यांच्या टेबलावर आदळत त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

गेल्या काही दिवसांपासून सोलापूरच्या ग्रामीण भागात महावितरणच्या लहरी कारभारामुळे वीज पुरवठा पूर्णपणे कोलमडला आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिवसा सलग ८ तास वीज देण्याची मोठी घोषणा केली होती. मात्र, प्रत्यक्षात दिवसातून ६ ते १० वेळा वीज खंडित होत असल्याने ही घोषणा केवळ कागदावरच उरल्याचे समोर आले आहे.

पुणे परिसरात झालेल्या पावसामुळे उजनी धरणातून नदी आणि कालव्यांमध्ये पाणी सोडण्यात आले आहे. पाण्याचा स्रोत उपलब्ध असूनही विजेअभावी उपसा करता येत नसल्याने शेतातील उभी पिकं करपून चालली आहेत. खासदार शिंदे यांनी गेल्या दोन दिवसांत ग्रामीण भागाचा दौरा करून शेतकऱ्यांची ही व्यथा जाणून घेतली होती.त्यानंतर सोमवारी सकाळी शेकडो संतप्त शेतकऱ्यांसह खासदार शिंदे यांनी जुनी मिल भागातील महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरू केले.

दोन दिवासंपूर्वीच पालकमंत्री गोरेंनी महावितरणचा घेतला आढावा….

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी अनियमीत वीज कपातमुद्यावरून महावितरणच्या अधिकार्यांची तातडीची आँनलाईन बैठक घेऊन कानउघडणी केली होती. तसेच, शेतकर्यांशी उद्घट वर्तन केल्याप्रकरणी पंढरपूरच्या कार्यकारी अभियंत्यास कारणे दाखवा नोटिस देण्याच आदेश दिले होते. तसेच, तातडीच्या भारनियमाची आवश्यकता असल्यास वेळ व कालावधी निश्चित करण्याचे आदेश पालकमंत्री गोरे यांनी दिले होते.

अखेर आंदोलनाचा वाढता दबाव पाहून अधीक्षक अभियंत्यांनी वरिष्ठांशी तातडीने संपर्क साधला. ग्रामीण भागात पुढील २ दिवसांत सलग वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील आणि किमान सलग ८ तास थ्री-फेज, सिंगल फेज वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तब्बल एका तासाने हे ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्यासह पंढरपूर, मंगळवेढा, दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी सहभागी झाले होते.