सोलापूर : मागील ३३ दिवासानंतर रविवारी (दि.२) सोलापूरच्या विमानतळावरून ४८ प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने विमान झेपावले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुरावामुळे तांत्रिक कारणावरून बंद करण्यात आलेली विमानसेवा पुन्हा सुरु झाली आहे.
‘स्टार एअर या कंपनीची सोलापूर-मुंबई विमानसेवा सुरु होती. २८ जूनपासून तांत्रिक व दृश्यमानतेचे कारण पुढे करत सेवा बंद केली होती. मात्र, विमान कंपन्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठीच ही सेवा बंद केल्याचा आरोप करत, शासनाने त्यांचे अनुदान रोखण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी कंपन्यांची बैठक घेऊन, ‘सेवा सुरू करा, अन्यथा अनुदान नाही’ अशी रोखठोक भूमिका मांडली. केंद्र सरकारकडेही याविषयी तगादा लावण्यात आला होता. या संयुक्त प्रयत्नांमुळे सोलापूरकरांची हवाई कोंडी अखेर फुटली. या विमानसेवेमुळे व्यापारी, उद्योजक, आयटी व्यावसायिक आणि वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांची मोठी सोय झाली आहे. २ आँगस्टला पहिल्या दिवशी मुंबई येथून ३३ प्रवासी सोलापूरात उतरले. तर, सोलापूरातून ४८ प्रवासी मुंबईला गेले आहेत.
असे नवीन वेळापत्रक (२ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६)
आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशा चार दिवसांसाठी हे वेळापत्रक लागू राहील.
- सोमवार आणि बुधवार :
आगमन (सोलापूर) : सायंकाळी ५:१० वाजता
प्रस्थान (मुंबईसाठी) : सायंकाळी ५:४० वाजता
- शुक्रवार आणि रविवार :
आगमन (सोलापूर) : दुपारी १:३० वाजता
प्रस्थान (मुंबईसाठी) : दुपारी २:०० वाजता
“सोलापूरच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी मुंबईची हवाई जोडणी महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समस्येची गांभीर्याने दखल घेतल्यानेच ही सेवा पुन्हा सुरू झाली आहे. आगामी काळात दळणवळणाला गती मिळेल.” — जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर.
