सोलापूर : राज्य शासनाने विमान कंपन्यांना आर्थिक अनुदान न देण्याचा कठोर इशारा देताच, गेल्या महिनाभरापासून तांत्रिक कारणास्तव बंद असलेली सोलापूर-मुंबई विमानसेवा अखेर २ ऑगस्ट २०२६ पासून पूर्ववत सुरू होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर ‘स्टार एअर’ कंपनीने नमते घेत तिकीट विक्रीचे ऑनलाइन बुकिंग पोर्टल खुले केले आहे. या निर्णयामुळे गेल्या महिनाभरापासून रखडलेली सोलापूरकरांची हवाई कोंडी अखेर फुटली आहे.

‘स्टार एअर’ आणि ‘फ्लाय ९१’ या दोन्ही विमान कंपन्यांनी २८ जूनपासून सोलापूर-मुंबई व सोलापूर-गोवा विमानसेवा तांत्रिक व दृश्यमानतेचे कारण पुढे करत अचानक बंद केली होती. मात्र, विमान कंपन्यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठीच ही सेवा बंद केल्याचे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समोर आले होते. त्यानुसार, शासनाने त्यांचे अनुदान रोखण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आदेशान्वये महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी कंपन्यांची बैठक घेऊन, ‘अनावश्यक तांत्रिक कारणे न देता सेवा सुरू करा, अन्यथा अनुदान मिळणार नाही’ अशी रोखठोक भूमिका मांडली.

सोलापुरात पाऊस नसताना आणि उड्डाणे दिवसा असल्याने नाईट लँडिंगचा प्रश्न नसतानाही सेवा बंद झाल्याने, सामाजिक संघटना व विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका होत होती. त्यातच व्यापारी, आयटी व्यावसायिक आणि मुंबईला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची मोठी गैरसोय होत होती. अखेर पालकमंत्री गोरे यांनी मुख्यमंत्री कार्यालय आणि दिल्लीत केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे लावलेल्या तगाद्यामुळे ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. हवाई सेवा पूर्ववत होणार असल्याने सोलापूरच्या व्यापारी आणि उद्योजक वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

असे असेल नवीन वेळापत्रक (२ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबर २०२६)

विमानतळ प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशा चार दिवसांसाठी हे वेळापत्रक लागू राहील. १५ ऑक्टोबरनंतर हिवाळी वेळापत्रकानुसार यात बदल होऊ शकतो.

सोमवार आणि बुधवार

आगमन (सोलापूर) : सायंकाळी ५:१० वाजता

प्रस्थान (मुंबईसाठी) : सायंकाळी ५:४० वाजता

शुक्रवार आणि रविवार :

आगमन (सोलापूर) : दुपारी १:३० वाजता

प्रस्थान (मुंबईसाठी) : दुपारी २:०० वाजता

“सोलापूरच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासासाठी मुंबईसोबतची हवाई जोडणी अत्यंत महत्त्वाची आहे. सेवा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल होत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेत पाठबळ दिले, त्यामुळेच ही सेवा पुन्हा सुरू होत आहे. आगामी काळात सोलापूरच्या दळणवळणाला यामुळे मोठी गती मिळेल.”

  • जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर.

सोलापूरची विमानसेवा पुन्हा सुरु व्हावी, यासाठी सोलापूर विकास मंच तर्फे सातत्यााने पाठपुरावा सुरु केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पाठपुरावामुळे आठवड्यातून चार दिवस पुन्हा विमानसेवा सुरु होणार आहे. तिकीट विक्रीला सुरवात झाली आहे. आता, सोलापूर- हैदराबाद व सोलापूर- तिरुपती विमान सेवा देखील सुरु व्हावी यासाठी विकासमंच प्रयत्नशील आहे. पुन्हा विमानसेवा सुरु होणे, हा सोलापूरकरांच्या एकजुटीचा विजय आहे.

  • केतन शहा, सोलापूर विकास मंच