Solapur Municipal Election BJP Setback: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपंचायत आणि नगर परिषद निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये संपूर्ण राज्यात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. असे असले तरी, सोलापूर जिल्ह्यात मात्र भाजपाची मोठी पिछेहाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. कारण १२ पैकी केवळ बार्शी, मैंदर्गी, अक्कलकोट आणि अनगर येथेच भाजपाचे नगराध्यक्ष विजयी झाले आहेत. या निकालानंतर राष्ट्रवादीचे (शरद पवार) माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना टोला लगावला आहे. या निवडणुकीत पालकमंत्र्यांचे ३०० कोटी रुपये वाया गेले, असे त्यांनी म्हटले आहे.
भाजपा म्हणजे आता एक तुरुंग
निकालानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आणि भाजपावर टीका करताना आमदार उत्तमराव जानकर म्हणाले की, “भाजपा म्हणजे आता एक तुरुंग झाला आहे. या पक्षाच्या तुरुंगात जाण्यासाठी लोकांची रांग लागलेली आहे. हे चित्र या राज्यामध्ये बदलणे गरजेचे होते आणि सोलापूर जिल्ह्याने या ठिकाणी आपले काम केले आहे. भारतीय जनता पार्टीला धूळ चारलेली आहे आणि हे चित्र यापुढच्या काळात होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये दिसणार आहे.”
पालकमंत्र्यांचे ३०० कोटी रुपये वाया गेले
“या निवडणुकीत पैशाचा किती चुराडा करावा, पालकमंत्र्यांचे ३०० कोटी रुपये वाया गेले. शेवटी अकलूजमध्ये पाच मतांना दीड लाख रुपये वाटले, म्हणजे ३० हजार रुपयांना एक मत, या पद्धतीने त्यांनी शेवटपर्यंत झुंज दिली. या जिल्ह्यामधले हे चित्र बघून पालकमंत्र्यांनी आता पुन्हा या जिल्ह्यामध्ये पाऊल ठेवू नये, हाच संदेश या जिल्ह्याने दिलेला आहे”, असे आमदार उत्तमराव जानकर म्हणाले.
सोलापूर जिल्ह्याचा निकाल
नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूकीत अक्कलकोट, मैंदर्गी, बार्शी आणि अनगर या चार ठिकाणी भाजपाचे उमेदवार नगराध्यक्षपदी विजय झाले. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दुधनी, सांगोला आणि मोहोळ या तीन ठिकाणी यश मिळाले. शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना प्रत्येकी एक नगराध्यक्ष निवडून आणता आला. तर तीन ठिकाणी स्थानिक आघाड्यांचे नगराध्यक्ष विजयी झाले.
