|| एजाज हुसेन मुजावर
सोलापूर : राज्यात पुन्हा सत्तेत येताच राष्ट्रवादी काँग्रेसने पक्षाची ताकद वाढविण्यावर भर दिला. यानुसारच सोलापूर जिल्ह्यातही राष्ट्रवादी प्रबळ होत आहे. मात्र त्याच वेळी पक्षांतर्गत धुसफुस वाढत चालली असून यात नव्या-जुन्यांचा, निष्ठावंत आणि उपरे किंवा पक्ष अडचणीत असताना पक्षाला रामराम ठोकलेले आणि पक्ष सत्तेवर येताच पुन्हा पक्षात दाखल झालेल्या मंडळींमध्ये कुरबुरी वाढत आहेत.
एवढेच नव्हे तर यापूर्वी दोन पक्ष फिरून राष्ट्रवादीत येऊ इच्छिणाऱ्या नेत्यांच्या राजकारणामुळेही राष्ट्रवादीत शीतयुद्ध सुरू आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी तडकाफडकी दिलेला पदाचा राजीनामा आणि पक्षश्रेष्ठींनी पुन्हा त्यांच्याच नेतृत्वाला दिलेली ताकद, या पार्श्वभूमीवर पुन्हा सुरू झालेले कुरघोड्यांचे राजकारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला त्रासदायक ठरू शकते.
उत्तर सोलापूर तालुक्यातील ज्येष्ठ नेते बळीराम साठे हे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद सांभाळत आहेत. जिल्हा परिषदेच्या विविध विषय समित्यांच्या सभापतिपदांसह अध्यक्षपदाचा कारभार पाहिलेले साठे हे अनुभवी आणि संयमी नेते म्हणून परिचित आहेत; परंतु गेल्या आठवड्यात त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता; परंतु जिल्हाध्यक्षपद साठे यांच्याकडेच शाबूत राहावे म्हणून मोहोळचे माजी आमदार राजन पाटील-अनगरकर, आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीच्या वाटेवर असलेले सोलापूरचे माजी महापौर महेश कोठे आदींनी तातडीने मुंबई गाठून पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली. त्यानंतर पुन्हा वेगळी चक्रे फिरली आणि साठे यांचा राजीनामा नामंजूर होऊन जिल्हाध्यक्षपद त्यांच्याकडेच अबाधित ठेवले गेले. या घडामोडीमुळे पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष, माजी आमदार दीपक साळुंखे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील आदी मंडळींचा हिरमोड झाला. या पार्श्वभूमीवर पक्षातील शीतयुद्ध न थांबता सुरूच राहिल्याचे दिसून येते. या घडामोडीत सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीचे सत्ताकारण प्रमुख केंद्र्रंबदू मानले जात आहे. यापूर्वी २०१४ ते २०१९ दरम्यान मोदीलाटेत ज्येष्ठ नेते विजर्यंसह मोहिते-पाटील व त्यांचे कुटुंबीय यांनी राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. मोहिते-पाटील यांचे भाजपमध्ये जाणे हे राष्ट्रवादी काँग्रेससाठी अपेक्षितच होते; परंतु २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी जेव्हा सोलापूर जिल्ह्यातून राज्याच्या दौऱ्याला सुरुवात केली, तेव्हा हुतात्मा स्मृतिमंदिरात झालेल्या पक्षमेळाव्याकडे सध्या पक्षात असलेल्या अनेक भल्याभल्या नेत्यांनी पाठ दाखविली होती. विधानसभा निवडणुकीत तर काही जणांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. या परिस्थितीत पक्ष तावून सुलाखून निघाला. योगायोगाने राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले. त्यात राष्ट्रवादी आणि शरद पवार यांचे महत्त्व अबाधित राहिले. त्यामुळे कालपर्यंत पक्षाच्या वर्तुळाबाहेर राहिलेली किंवा कुंपणावर बसलेली मंडळी पुन्हा फिरून शरद पवार आणि अजित पवार यांचा जयजयकार करीत निष्ठेचे प्रदर्शन करू लागली. सत्तेच्या वर्तुळात वावरताना हातात पद असणे महत्त्वाचे असते. मग याच भूमिकेतून जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याविरोधात कुरघोड्या सुरू झाल्या. साठे यांचे वय झाले आहे. त्यांना पक्ष बळकट करण्यासाठी जिल्ह्यात दौरे काढता येत नाहीत, त्यांना विश्रांतीची गरज आहे.
त्यांच्याऐवजी ताज्या दमाच्या नेतृत्वाकडे जिल्हाध्यक्षपदाची धुरा सोपविणे गरजेचे आहे, अशा स्वरूपाची कुजबुज सुरू झाली. त्या अनुषंगाने हालचालीही होऊ लागल्या. जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक मानले जाणारे दीपक साळुंखे यांनी साठे यांच्याविरोधात उमेश पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. यातच आणखी एक योगायोग म्हणजे बळीराम साठे यांच्या उत्तर सोलापूर तालुक्यातील त्यांचे पारंपरिक विरोधक समजले जाणारे माजी आमदार दिलीप ब्रह्मदेव माने हे अलीकडे राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. पूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत जाऊनही आमदारकीचे गणित चुकलेले दिलीप माने हे महत्त्वाकांक्षी नेते म्हणून ओळखले जातात.
राज्यात तिसऱ्या क्रमांकाच्या समजल्या जाणाऱ्या सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समिती पुन्हा ताब्यात घेण्यासाठी दिलीप माने यांना राष्ट्रवादीची साथ हवी आहे. त्या दृष्टीने राष्ट्रवादीही माने यांचे महत्त्व जाणून आहे. त्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे आपले राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याविरोधातील शिडेत दिलीप माने हे हवा भरत असल्याचे सांगितले जाते. माने यांनी स्वत:चे वजन दाखविण्यासाठी अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांना राष्ट्रवादीत खेचून आणण्याचा शब्द दिल्याचेही बोलले जाते. या साऱ्या गोंधळात राष्ट्रवादीतील गटबाजी मात्र वाढत गेली.