सोलापूर शहरातील सर्वात प्रसिद्ध असलेल्या मुल्तानी बेकरीचे मालक सुनील सदारंगानी यांनी विजयपूर रोडवर असलेल्या पनाश अपार्टमेंटच्या १७ व्या मजल्यावरुन उडी मारत आत्महत्या केली. समोर आलेल्या माहितीनुसार सुनील सदारंगानी यांनी गुरुवारी दुपारी हे टोकाचं पाऊल उचललं.
गुरुवारी दुपारी नेमकं काय घडलं?
सुनील सदारंगानी त्यांच्या पनाश अपार्टमेंटमध्ये गेले. १७ व्या मजल्यावर ते पायऱ्या चढून गेले. त्यांनी छतावर उभं राहून हात जोडले. त्यांना जेव्हा अशा अवस्थेत काही लोकांनी खालून पाहिलं तेव्हा सुरक्षा रक्षकाला माहिती दिली. त्यानंतर सुरक्षा रक्षक लगेच वरती पोहचला. त्याने सदारंगानी यांना समजावलं आणि खाली आणलं. मात्र खालच्या मजल्यावर आल्यानंतर सदारंगानी म्हणाले की चावी वरच राहिली आहे. ती घेऊन येतो. १७ व्या मजल्यावर ते पुन्हा गेले आणि त्यांनी उडी मारुन आयुष्य संपवलं. सुनील सदारंगानी यांनी उडी मारल्यानंतर ते १७ व्या मजल्यावरुन खाली कोसळले आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला.
सुनील सदारंगानी यांनी टोकाचं पाऊल का उचललं? पोलिसांकडून तपास सुरु
सुनील सदारंगानी यांनी हे पाऊल उचलताच त्या ठिकाणी पोलिसांना बोलवण्यात आलं. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसंच सदारंगानी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. सदारंगानी यांनी आत्महत्या का केली? हे समजू शकलेलं नाही. पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. सुनील सदारंगानी हे सोलापुरातील प्रसिद्ध मुल्तानी बेकरीचे मालक होते. राजकुमार राठी यांचे जावई होते. मुल्तानी बेकरी बंद पडल्यानंतर ते पुण्यात वास्तव्यास गेले होते. पुण्याच्या खराडी भागात त्यांचं वास्तव्य होतं. मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी मागील काही काळापासून आर्थिक अडचणींचा सामना करत होते. तसंच त्यांच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार देखील सुरू होते. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे. सुनील सदारंगानी यांच्या आत्महत्येमागे कौटुंबिक कारण आहे की आर्थिक समस्या? याचा शोध घेतला जातोय.
प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने काय सांगितलं?
पनाश या इमारतीच्या टेरेसच्या कठड्यावर एक व्यक्ती उभी असल्याचे दिसताच स्थानिकांनी तातडीने इमारतीच्या सुरक्षारक्षकाला सावध केले. सुरक्षारक्षकाने प्रसंगावधान राखून १७ व्या मजल्यावर धाव घेतली आणि सदारंगानी यांना सुखरूप खाली आणले. पण थोड्याच वेळात “माझी चावी वरच राहिली आहे” असं खोटं सांगून सदारंगानी पुन्हा वर गेले. यावेळी कोणालाही काही समजण्यापूर्वीच त्यांनी इमारतीच्या १७ व्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला अशी माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

