पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यात भाजप नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद आणि आता पंचायत समितीवर वर्चस्व राखण्यात यशस्वी झाला आहे. जिल्ह्यातील ११ पंचायत समितींपैकी १० ठिकाणी भाजपचे सभापती तर एका ठिकाणी शिवसेना (शिंदे) पक्षाचे सभापतिपदी निवड झाली. सांगोल्यात सांगोला विकास आघाडीच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने शेकापला धक्का देत भाजपचा सभापती झाला. दरम्यान, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यात कमळ फुलविण्यात यशस्वी झाले आहेत.
कधीकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजपने गेल्या काही वर्षांत चांगलीच मुसंडी मारली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात आणले. जिल्ह्यातील ११ पंचायत समितीपैकी १० ठिकाणी भाजपचे सभापती झाले. तर ६ ठिकाणी उपसभापती तर माढा येथील पंचायत समितीमध्ये भाजप पुरस्कृत अपक्षाची या पदावर निवड झाली.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे दोन ठिकाणी उपसभापती तर एका ठिकाणी शिवसेनेचा उपसभापती झाला आहे. माळशिरस तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने शिवसेना (शिंदे), काँग्रेस अशी महायुती करून निवडणूक लढले होते. यात शिवसेना (शिंदे) पक्षाला सभापतिपद तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे उपसभापती झाले आहेत.
निवड झालेले पदाधिकारी पुढीप्रमाणे – अक्कलकोट -रश्मी सागर हिपरग्गी (सभापती), सागर सिद्धप्पा कल्याणशेट्टी (उपसभापतिपदी), दक्षिण सोलापूर – संदीप अमृत टेळे (सभापती), वर्षा सोमनाथ पटणे (उपसभापती), उत्तर सोलापूर – तेजस्विनी अमोल बोराडे (सभापती), सुनील दगडू भोसले (उपसभापती), मोहोळ – असलम गफूर चौधरी (सभापती), उज्वला राजकुमार पाटील (उपसभापती), बार्शी – मीनाक्षी मुरलीधर रोंगे (सभापती), संतोष चंद्रकांत निंबाळकर (उपसभापती), मंगळवेढा – दीपाली अनंत ताड (सभापती), अर्जुन तुकाराम मल्लाळे (उपसभापती), करमाळा – पूजा सचिन ढेरे (सभापती), अजिनाथ सर्जेराव विघ्ने (उपसभापती), माढा – पंडित तुकाराम देशमुख (सभापती), स्वाती हनुमंत गिड्डे (उपसभापती), सांगोला – पूनम सुरेश आगावणे (सभापती), अजय उत्तम सरगर (उपसभापती), पंढरपूर – शुभम सुरेश आगावणे (सभापती), पक्षाचे प्रमोद हरी देशमुख (उपसभापती), माळशिरस – दत्तात्रय रावसाहेब मगर (सभापती), मनीषा अमोल पाटील (उपसभापती), यांची निवड झाली आहे.
कधीकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात भाजपने गेल्या काही वर्षांत चांगलीच मुसंडी मारली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत महाविकास आघाडीचे अस्तित्व संपुष्टात आणले. स्थानिक संस्था, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत भाजपला संघर्ष करावा लागला. मात्र पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील राजकारण बदलले. जिल्ह्यात रखडलेला विकासाला चालना दिली. भाजप पक्ष बांधला. शहरी आणि ग्रामीण भागात पक्षाचे चिन्ह कमळ रुजविण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवत पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. त्यांना स्थानिक आणि राज्याच्या नेत्यांनी पाठबळ दिल्याने भाजप तळागाळात रुजला. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपला यश मिळाले.
