सोलापूर : सोलापूर शहरासह बारामती परिसरात घरफोड्या केलेल्या एका संशयिताला सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून घरफोड्यांतून लांबविले गेलेले ३९ तोळे सोने आणि १८ किलो चांदी या किंमती ऐवजासह गुन्ह्यात वापरली गेलेली मोटार व अन्य साहित्य असा सुमारे २८ लाख ४१ हजार ४०० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

राजकुमार पंडित विभूते (वय ४२, रा. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर) असे या घरफोड्यांच्या गुन्ह्यांतील आरोपीचे नाव आहे. सोलापूर कृषिउत्पन्न बाजार समितीसमोरील चौकात पहाटे संशयास्पदरीत्या फिरताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्यास हटकले. त्यास पोलिसी खाक्या दाखविताच त्याने जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या एका घरफोडीची कबुली दिली. नंतर पोलीस कोठडीत असताना त्याने मागील वर्षात आणखी पाच घरफोड्या केल्याची कबुली दिली. यात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन, फौजदार चावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक आणि बारामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन याप्रमाणे घरफोड्यांची माहिती समोर आली.

हेही वाचा : “जयंतराव तुम्ही नकली वाघांबरोबर आहात, असली वाघांबरोबर या”, मुख्यमंत्री शिंदेंचा टोला

या सर्व गुन्ह्यांत लंपास केलेले १६ लाख ४९ हजार रूपये किंमतीचे ३८.९ तोळे सोन्याचे दागिने, सहा लाख ७३ हजार रूपये किंमतीचे १७.८३० किलो वजनाचे चांदीचे अलंकार व दागिने असा ऐवज हस्तगत करण्यात आला. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटार आणि घरफोड्या करून लंपास केलेले सोन्याचे दागिने वितळविण्यासाठी वापरात असलेले यंत्र आणि अन्य साहित्यही जप्त करण्यात आले. याबाबतची माहिती पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी दिली. हे घरफोड्यांचे गुन्हे उजेडात आणण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या पथकाने कामगिरी केल्याचे राजकुमार यांनी सांगितले.

Story img Loader