सोलापूर : सध्याच्या उन्हाळय़ात राज्यात विजेची मागणी वाढली असताना त्याप्रमाणात वीज उपलब्ध होत नसल्यामुळे भारनियमनाला सामोरे लागत आहे.  या पार्श्वभूमीवर वीज बचतीचा पर्याय महत्त्वाचा असून तो सोलापूरच्या पोलीस आयुक्तालयाने यापूर्वीच कृतीत उतरविला आहे. यातून वीजबचतीची दिशा दाखविली गेली आहे.

पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी गेल्या वर्षी ११ ऑक्टोबर रोजी पदभार हाती घेतल्यापासून ते कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कर्तव्य बजावत असताना लोकसहभागातून विविध उपक्रम राबवत आहेत. याशिवाय पोलीस प्रशासन चालविताना वीजबचतीलाही त्यांनी कटाक्षाने प्राधान्य दिले आहे.

ऑक्टोबर २०२१ मध्ये बैजल हे रुजू झाले तेव्हा पोलीस आयुक्तालयात होणारा वीज वापर कमी होण्यासाठी त्यांनी लक्ष घातले. त्याची सुरुवात त्यांनी स्वत:पासून केली. आपल्या सरकारी निवासस्थानासह दालनातील विद्युत दिवे, पंखे व इतर उपकरणांचा वापर त्यांनी कमी केला.  दालन बंद होण्यापूर्वी विद्युत उपकरणे बंद करण्याची दक्षता घ्यायची, अशा पद्धतीने वीजबचतीला बैजल यांनी सुरुवात केली. हीच बाब संपूर्ण आयुक्तालयाशी निगडित सर्व पोलीस ठाणे आणि कार्यालयांमध्ये अनुसरली गेली.

बैजल हे रुजू झाले तेव्हा आयुक्त कार्यालयाचा विजेवरचा मासिक खर्च एक लाख ३५ हजार ६२४ रुपये झाला होता. त्यात घट होऊन ८४ हजार ६९५ रुपयांपर्यंत वीज खर्च खाली आला आहे. संपूर्ण पोलीस आयुक्तालयाचा त्यावेळी विजेवरचा दरमहा खर्च सहा लाख ४८ हजारांवर होता. नंतर त्यात सातत्याने घट होऊन मागील फेब्रुवारीत विजेचा खर्च पाच लाख ५५ हजारांपर्यंत आला. यात दरमहा सरासरी एक लाखाची बचत होत असल्याचे स्वत: बैजल यांनी सांगितले. मागील मार्चमध्येही वीज बचतीचा मार्ग कायम राहिला.