सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात चालू मे महिन्यात मागील १५ दिवसांपासून पावसाचे सातत्य कायम आहे. बुधवारी सकाळी संपलेल्या २४ तासांत तुलनेने कमी प्रमाणात म्हणजे सरासरी १०.६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली तरी आतापर्यंत २१७ मिमी पर्यंत पडलेला पाऊस पाहता एकूण चार महिन्यांच्या पावसाळ्यात पडणाऱ्या एकूण पावसापैकी ४५ टक्के पाऊस झाला आहे. तर माळशिरस, करमाळा व माढा या तालुक्यांत ५० टक्क्यांहून जास्त पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात पावसाळ्यात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या हंगामात सरासरी ४८१ मिमी पाऊस पडतो. गतवर्षी पावसाळी हंगामात एकूण सरासरीपेक्षा जास्त म्हणजे ६२२.१ मिमी (१२९.३ टक्के) पाऊस झाला होता. यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच, जून महिना उजाडण्याअगोदरच मे महिन्यात १५ दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. आतापर्यंत एकूण सरासरी २१७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. सर्वाधिक २८२.६ मिमी पाऊस माळशिरस तालुक्यात झाल्याची नोंद करण्यात आली आहे. त्याखालोखाल करमाळा तालुक्यात २५८.६, उत्तर सोलापूर तालुक्यात २५५.६, माढा तालुक्यात २५४.७, सांगोल्यात २१६.९, बार्शीमध्ये २१०.८ याप्रमाणे पाऊस झाला आहे.
आतापर्यंत पडलेल्या पावसाची एकूण पावसाळी हंगामात पडणाऱ्या सरासरीच्या तुलनेत माळशिरस तालुक्यात सर्वाधिक ६६.४८ टक्के तर करमाळा तालुक्यात ५६ टक्के पाऊस झाला आहे. माढा तालुक्यात ५३.६० टक्के पावसाची नोंद झाली आहे. सांगोला-४६.३२ टक्के, उत्तर सोलापूर-४६.३० टक्के, मोहोळ-४२.५४ टक्के, मंगळवेढा-४२ टक्के, बार्शी-३९.९१ टक्के, दक्षिण सोलापूर-३५.८९ टक्के, अक्कलकोट-३५.११ टक्के आणि पंढरपूर-३० टक्के याप्रमाणे एकूण पावसाळी हंगामातील पावसाच्या तुलनेत चालू महिन्यातील १५ दिवसांत पडलेल्या पावसाचे प्रमाण आहे.
बुधवारी सकाळी आकाश काहीसे निरभ्र दिसत होते. यातून पाऊस उघडीप देण्याची चिन्हे दिसत होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु, दुपारनंतर पुन्हा आकाशात ढगांची गर्दी झाली आणि पाठोपाठ पावसाच्या सरी कोसळू लागल्या. सायंकाळी अधुनमधून पावसाचा जोर सुरू होता.