सोलापूर : सोलापूर-पुणे महामार्गावर टेंभुर्णीजवळ एका धावत्या खासगी प्रवासी आराम बसला अचानकपणे आग लागली. सुदैवाने बस चालकाने वेळीच प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे बसमधून खाली उतरविले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. अलीकडे सोलापूर परिसरात रस्त्यावर धावत्या बसेससह अन्य वाहनांना आग लागण्याची ही पाचवी घटना आहे.
टेंभुर्णीजवळ वेणेगाव येथे एलपीजी गॅस पंपासमोर सकाळी आठच्या सुमारास बेस्ट एक्सप्रेस नावाची खासगी प्रवासी आराम बस हैदराबाद येथून मुंबईकडे जात असताना अचानकपणे बसच्या इंजिनमधून धूर निघून आग लागल्याचे दिसून आले. बसचालक अब्दुल इम्तियाज (रा. हैदराबाद) यांनी अजिबात विचलित न होता प्रसंगावधान राखून सर्व प्रवाशांना बसमधून तत्काळ खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. बसमध्ये १५ प्रवासी होते.
सर्व प्रवासी जीवाच्या आकांताने बसमधून खाली उतरले तरीही त्यांच्या पिशव्या, सामान बसच्या डिकीत होते. परंतु बस जळत असताना प्रवाशांना आपापले सामान डिकीमधून काढण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर काही क्षणातच बसला लपेटलेल्या आगीने रौद्ररूप धारण केले होते.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व सहायक पोलीस निरीक्षक गिरीश जोग हे घटनास्थळी धावून आले. अग्निशमन यंत्रणेला पाचारण करण्यात आले. सुमारे दीड तासानंतर आग नियंत्रणात आणण्यात अग्निशमन यंत्रणेला यश आले. बसचालक अब्दुल इम्तियाज यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेची नोंद टेंभुर्णी पोलीस ठाण्यात झाली आहे.
सध्याच्या प्रखर उन्हाळ्यात सोलापूर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून भर दुपारी तळपत्या उन्हात रस्त्यावर धावणाऱ्या तीन बसेससह एक मोटार आणि एक दुचाकी अशा पाच वाहनांना आग लागून सर्व वाहने भक्ष्यस्थानी पडली आहेत. अलीकडे तापमानाचा पारा खाली उतरल्याने उष्णता घटली तरीही रस्त्यावर वाहनांना आग लागत आहे. टेंभुर्णीजवळ घडलेली खासगी आराम बस जाळीत घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. त्यामुळे आगीचे निश्चित कारण पडताळून पाहण्याची जबाबदारी राज्य परिवहन विभागाच्या यंत्रणेवर आली आहे.