सोलापूर : जिल्ह्यातील शेतकरी आणि नागरिक ज्या पावसाची चातकासारखी वाट पाहत होते, त्याने तब्बल १८ दिवसांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर बुधवारी सायंकाळी सोलापूर शहर व परिसरात हजेरी लावली. आषाढ महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुनर्वसू नक्षत्राच्या जोरदार सरी कोसळल्याने सुकण्याच्या मार्गावर असलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून, बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
जिल्ह्यात गत २८ जून रोजी झालेल्या पावसानंतर माळशिरस, माढा आणि बार्शीच्या काही भागांत शेतकऱ्यांनी सोयाबीन, तूर यांसारख्या खरीप पिकांची पेरणी केली होती. मात्र, त्यानंतर पावसाने मारलेली दडी आणि वाढलेल्या उन्हाच्या तीव्रतेमुळे उगवलेले अंकुर कोमेजू लागले होते. त्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. बुधवारी सायंकाळी अचानक ढगांची दाटी झाली आणि सुमारे २० मिनिटे वादळी वाऱ्यासह पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. या पावसामुळे कोलेजलेल्या अंकुरांना मोठा आधार मिळाला आहे.
बळीराजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेतच
शेजारील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आलेला असताना, सोलापूर जिल्हा मात्र अद्यापही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे. सोलापूर जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी ४८१.१ मिमी इतकी आहे; परंतु चालू हंगामात आतापर्यंत केवळ १२३.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पेरण्या खोळंबल्या, अवघा २८ टक्के पेरा
जिल्ह्यात खरिपाचे सरासरी क्षेत्र ३ लाख ३७ हजार हेक्टर असून, पावसाअभावी आतापर्यंत केवळ ९७ हजार हेक्टर क्षेत्रावरच पेरणी होऊ शकली आहे. म्हणजेच जिल्ह्यात आतापर्यंत अवघी २८ टक्के पेरणी झाली असून, उर्वरित पेरण्यांसाठी अजूनही मोठ्या आणि सार्वत्रिक पावसाची आवश्यकता आहे.
दरम्यान, बुधवारी आषाढाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी आकाश काळ्या ढगांनी व्यापून गेल्याने मोठ्या पावसाची चिन्हे होती. मात्र, जोरदार वादळामुळे ढग पुढे सरकल्याने सोलापूरकरांची मोठ्या पावसाची अपेक्षा अंशतः भंग पावली. तरीही, अचानक आलेल्या या पावसामुळे सायंकाळी घरी परतणारे शाळकरी विद्यार्थी आणि नोकरदार वर्गाची तारांबळ उडाली आणि अनेक जण चिंब भिजले.
