सोलापूर: सोलापूर आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणारी, प्रवाशांची जीवनवाहिनी मानली गेलेली ‘सोलापूर-पुणे हुतात्मा सुपरफास्ट एक्सप्रेस’ (१२१५८) रौप्य महोत्सव पूर्ण करीत बुधवारी २६ व्या वर्षात पदार्पण केले. १५ जुलै २००१ रोजी सुरू झालेल्या या रेल्वे सेवेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, ‘प्रवासी सेवा संघ, सोलापूर’च्या वतीने सोलापूर रेल्वे स्थानकावर बुधवारी रौप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या ऐतिहासिक सोहळ्याचे औचित्य साधून प्रवासी संघाच्या कार्यकर्त्यांनी गाडीच्या डब्यांची फुलांनी आकर्षक सजावट केली होती. रेल्वेचे विभागीय निरीक्षक निहारकांती, तिकीट निरीक्षक विभागाचे साहिल मुलाणी आणि स्वच्छता विभागातील कर्मचारी निखिल गायकवाड यांच्या हस्ते केक कापून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी प्रवाशांना आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले.

सोलापूरच्या स्वातंत्र्यलढ्यातील चार अमर हुतात्मे (जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा आणि मल्लप्पा धनशेट्टी ) यांच्या स्मृती प्रित्यर्थ या गाडीचे ‘हुतात्मा’ असे नामकरण करण्यात आले आहे. ४ तासांत २६३ किलोमीटरचे अंतर पार करणारी ही गाडी कुर्डुवाडी आणि दौंड या प्रमुख स्थानकांवर थांबते. सध्या ही गाडी १ वातानुकूलित आसनी डबा, १ वातानुकूलित त्रिस्तरीय इकॉनॉमी डबा, २ शयनयान डबे आणि १० द्वितीय श्रेणी आसनी डब्यांसह एकूण १६ डब्यांच्या रचनेमध्ये धावत आहे.

कार्यक्रमात बोलताना प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी हुतात्मा एक्सप्रेसच्या वक्तशीर आणि सुखकर सेवेबद्दल रेल्वे प्रशासनाचे आभार मानले. सोबतच, ग्रामीण भागातील प्रवाशांची अडचण दूर करण्यासाठी या गाडीला अतिरिक्त थांबे देण्याची मागणी केली.

धाराशिव, तुळजापूर, वैराग आणि माढा परिसरातील नागरिकांसाठी ‘माढा’ स्थानकावर, तर करमाळा, परंडा, जामखेड व उजनी धरण क्षेत्रातील प्रवाशांसाठी ‘जेऊर’ स्थानकावर या गाडीला दोन्ही बाजूने थांबा मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी सोलापूर व माढा मतदारसंघाच्या लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी दिल्लीतील रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा करावा, असे आवाहन त्यांनी केले. या सोहळ्याला नंदू दळवी, संजय चौगुले, सिद्राम नुल्ला, निखिल दळवी, राजाभाऊ जाधव, गौतम कांबळे, नीता सोनवणे, नागेश पाटोळे यांच्यासह प्रवासी संघाचे पदाधिकारी व रेल्वेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.