सोलापूर : कुर्डूवाडी-जेऊर दरम्यान भाळवणी येथे मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेगाडीवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. यात गाडीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या आणि तीन प्रवासी जखमी झाले. त्या पाठोपाठ कर्नाटक एक्स्प्रेसवर झालेल्या दगडफेकीत एक प्रवासी जखमी झाला. रात्री उशिरा घडलेल्या या घटनेची नोंद कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात झाली आहे.

मुंबई-हैदराबाद एक्स्प्रेसवर झालेल्या दगडफेकीत विजयकुमार योगी (वय ३६), शरद राहुल नाईक (वय ३८) आणि लक्ष्मी वडतिलम हे तीन प्रवासी जखमी झाले. या जखमींना कुर्डूवाडी रेल्वे स्थानकावर उतरवून त्यांच्यावर रेल्वे रुग्णालयात वैद्यकीय उपचार करण्यात आले. नंतर त्यांना सोलापूरकडे रवाना करण्यात आले. विजयकुमार योगी हे राजस्थानचे राहणारे असून, ते मुंबईहून हैदराबादकडे निघाले होते. दगडफेकीत त्यांच्या डोक्याला जखम झाली.

या घटनेच्या पाठोपाठ कर्नाटक एक्स्प्रेसवरही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. त्यात एका प्रवाशाला जखम झाली. अंधारात दगडफेक करणारे नंतर पळून गेले. दगडफेक करणारे चोरटे असावेत. लूटमार करण्याच्या हेतूनेच त्यांनी दगडफेक केली असावी, असा कयास व्यक्त होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मागील आठवड्यात सोलापूर-विजापूर रेल्वे मार्गावरही एका रेल्वेगाडीवर दगडफेक झाली होती. यात चार वर्षांच्या चिमुकलीच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा मृत्यू झाला होता.एरवी, सोलापूर-पुणे रेल्वेमार्गावर कुर्डूवाडी-जेऊर-दौंड दरम्यान जिंती, भाळवणी भागात अधूनमधून धावत्या रेल्वेगाडीवर दगडफेक होऊन लुटमारीचे प्रकार घडतात. या संवेदनशील भागात रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांकडून प्रवाशांना रेल्वेत स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खिडक्या बंद करण्याच्या सूचना दिल्या जातात.