करोनाबाधित झालेल्या सेवानिवृत्त सहायक फौजदार व त्यांचे पाच कुटुंबीय विलगीकरण कक्षात असल्याची संधी साधत, चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. अकलूजजवळ माळीनगरात हा प्रकार घडला. चोरट्यांनी पहाटे घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीला गेलेला एकूण ऐवज किती किंमतीचा होता, हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील सेवानिवृत्त सहायक फौजदार महादेव नारायण बनसोडे हे अकलूजजवळ माळीनगरातील रमामाता काॕलनीत राहतात. बनसोडे यांना काही दिवसांपूर्वी अस्वस्थ वाटू लागल्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता ते करोनाबाधित निघाले. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचीही चाचणी केली असता उर्वरीत पाचजण बाधित निघाले. संपूर्ण बनसोडे कुटुंबीयांची रवानगी विलगीकरण कक्षात झाली. इकडे घर बंद असल्याची संधी साधून चोरट्यांनी घर फोडले. बनसोडे यांचा नातेवाईक कांतिलाल हणमंत ठोकळे (रा. अकलूज) यांनी यासंदर्भात अकलूज पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली आहे.

अकलूजमध्ये यापूर्वीही एका व्यापाऱ्याचे कुटुंब विलगीकरण कक्षात असताना त्याचे घर फोडण्यात आले होते. त्यानंतर ते व्यापारी कुटुंब विलगीकरण कक्षातून घरी परत येत नाहीत, तोपर्यंत चोरट्यांनी पुन्हा त्यांचे औषध दुकानही फोडले होते. इकडे सोलापुरातही विलगीकरण कक्षात गेलेल्या तीन कुटुंबीयांची घरे फोडण्यात आली होती.