पंढरपूर : सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडे असलेली मते आहेत. त्याहून अधिकची २०० मते मिळून भाजपाचे राजेंद्र राऊत विजयी होतील, असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला आहे. सोलापुरात भाजपाने व्हीप जारी केला आहे. तसेच सातारा- सांगलीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने व्हीप जारी केला आहे. या दोन्ही ठिकाणी भाजपाचे उमेदवार विजयी होतील, असेही गोरे यांनी ठामपणे सांगितले.
पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना ठाकारे पक्षातील खासदार स्वतंत्र गट स्थापन करत आहे, असा प्रश्न विचारला असता गोरे यांनी मी भाजपाचा लहान कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय पातळीवर काय घडामोडी होत आहेत, याची मला कल्पना नाही, असा गट स्थापन होतो, याची माहिती नाही. पण नवीन गट होत असेल तर माझ्या शुभेच्छा आहेत. ज्यांनी नारीवंदन विधेयकाला विरोध केला त्यांना त्याचे उत्तर मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठल्याही परिस्थितीत नारी वंदन विधेयक मंजूर करण्याचा संकल्प केला आहे. जे जे घटक नारिवंदन विधेयक मंजूर होऊ नये म्हणून प्रयत्न करत होते त्यांच्या पक्षामध्ये असंतोष आहे. भविष्यात हे विधेयक मंजूर होईल आणि महिला भगिनींना न्याय मिळेल, असा विश्वास गोरे यांनी व्यक्त केला.
सोलापूर विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने पक्षादेश (व्हीप) जारी केला आहे. व्हीप बजावणे ही पक्षाची सर्वसाधारण प्रक्रिया आहे. भाजप कोणाला घाबरत नाही. भाजप उमेदवाराचे सर्व मतदार ठाम आहेत. भाजपकडे जेवढे मत आहेत, त्याहून २०० अधिक मते घेऊन आम्ही निवडून येऊ, असे गोरे म्हणाले. सातारा विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने भूमिका जाहीर केली आहे. सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आमच्यासोबत असून, त्यांनी आम्हाला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांनी व्हीप जारी केला आहे.
शिवसेनेचा निर्णय आज उद्यापर्यंत होणे अपेक्षित आहे, तोही निर्णय होईल. महायुती मजबूत आहे. अजिबात चिंता करू नका. भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठी जी व्यवस्था करायची आहे, ती केलेली आहे, असे गोरे यांनी स्पष्ट केले. साताऱ्यात निधी देण्याचा अधिकार हा शंभूराजे देसाई यांनाच आहे. त्यामुळे ते निधीवरून बिलकुल नाराज नाही, असेही ते म्हणाले. तर रोहित पवारांच्या आंदोलनावर पुन्हा एकदा गोरे यांनी शेलक्या भाषेत टीका केली. हे आंदोलन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी होते की प्रसिद्धीसाठी, याचे उत्तर शोधले पाहिजे.
