scorecardresearch

सोलापूर : काय झाडी, काय डोंगार फेम… शहाजीबापूंच्या सांगोल्यात विनायक राऊत घेणार सभा!

शिवसेनेकडून जोरदार तयारी, आढावा बैठकांचे सत्र सुरू

सोलापूर : काय झाडी, काय डोंगार फेम… शहाजीबापूंच्या सांगोल्यात विनायक राऊत घेणार सभा!
शिवसेना नेते विनायक राऊत व शहाजीबापू पाटील

राज्यात शिवसेनेत मोठी फूट पडत असताना त्यात एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेले आणि ‘ काय झाडी..काय डोंगार..काय हॉटेल..समदं ओक्केमंदी..’ या अफलातून संवादाने गाजलेले आमदार ॲड. शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला मतदारसंघात त्यांच्या विरोधात शिवसेनेने एल्गार पुकारला आहे. त्यासाठी येत्या रविवारी शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत हे शहाजीबापू पाटील यांच्या घरच्या मैदानात येणार आहेत.

राज्यात नाट्यमय राजकीय घडामोडी घडून शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर अडचणीत आलेला पक्ष सावरण्यासाठी शिवसेनेने जोरदार तयारी सुरू केली आहे. सोलापूर जिल्ह्यात विशेषतः सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांना लक्ष्य करण्याचे शिवसेनेने ठरविले आहे. येत्या रविवारी दुपारी बारा वाजता खासदार विनायक राऊत हे सांगोल्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहात आयोजित जाहीर सभेत आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडणार आहेत. रांगड्या स्वभावाचे आमदार शहाजीबापू पाटील हे सुध्दा फर्डे वक्ते आहेत. ते आपल्या माणदेशी भाषेतून खासदार राऊत यांच्यासह शिवसेनेला कशाप्रकारे प्रत्युत्तर देणार, याचीही सार्वत्रिक उत्सुकता आहे.

दरम्यान, शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी सोलापुरात दाखल होऊन शहर उत्तर, शहर मध्य आणि दक्षिण सोलापूर या तीन विधानसभा मतदारसंघांतील शिवसेनेच्या बांधणीचा आढावा घेतला. मंगळवेढा, मोहोळ, माढा, करमाळा, माळशिरस आणि पंढरपूर येथेही शिवसेनेच्या आढावा बैठकांचे सत्र सुरू झाले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Solapur shiv sena mp vinayak raut will hold a public meeting in shahjibapus sangola constituency msr

ताज्या बातम्या