सोलापूर : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्याच्या घोषणा आणि प्रत्यक्ष जमिनीवरील वास्तव यातील दरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. धाराशिवचे पालकमंत्री तथा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवारी (दि.३) सकाळी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला अचानक भेट देऊन पाहणी केली. मात्र, सरनाईक यांनी या बसस्थानकातील स्वच्छतेची पाहणी करण्याची ही तब्बल तिसरी वेळ असूनही परिस्थिती तसूभरही बदललेली नाही. त्यामुळे मंत्र्यांचे हे दौरे म्हणजे केवळ कॅमेऱ्यांपुरती केलेली औपचारिकता आणि ‘इव्हेंटबाजी’ ठरत आहे काय, असा प्रश्न प्रवासी वर्गातून उपस्थित होतोय.
यापूर्वी २२ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान परिवहन मंत्री सरनाईक यांनी अशाच प्रकारे सोलापूर एसटी बसस्थानकास अचानक भेट देऊन स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेची झाडाझडती घेतली होती. त्यावेळी त्यांनी निकृष्ट व्यवस्थेबद्दल अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले होते. त्यानंतरही त्यांनी आणखी दोनदा या स्थानकाची पाहणी केली होती. तरीही परिस्थिती सुधारण्याचे नाव घेत नसून, मंगळवारी झालेल्या पाचव्या पाहणी दौऱ्यानंतरही ‘जैसे थे’ चित्र कायम असल्याचे दिसून आले.
‘पावडर टाकून चालणार नाही’
धाराशिव दौऱ्यावर जाताना मंत्री सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकातील स्वच्छतागृहे आणि परिसराची पाहणी केली. यावेळी तीव्र दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पाहून मंत्र्यांचा पारा चढला. “गेल्या वेळी आलो होतो तेव्हाच घाण दिसल्यास जागेवर निलंबित करेन असा स्पष्ट इशारा दिला होता. तरीही तुमची हीच अवस्था आहे का? मंत्री येणार म्हणून केवळ पावडर टाकून चालणार नाही,” अशा खरमरीत शब्दांत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री म्हणाले, “मागच्या वेळेस आलो तेव्हा पाण्याची एक तोटी होती, आज चार तोट्या आहेत. मात्र महामंडळाने नेमलेल्या ठेकेदाराकडून काम करून घेणे हे अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. दिवाळी सुरू होत असल्याने कोणावर कारवाई करण्याची माझी इच्छा नाही. अधिकाऱ्यांना ही शेवटची १० ते १५ दिवसांची संधी देत असून यापुढे मात्र थेट कारवाई केली जाईल.”
२ ते ५ रुपयांचा अधिभार खिशात, सुविधा मात्र कचऱ्यात
एसटी प्रशासनाकडून प्रवाशांच्या प्रत्येक तिकिटामागे प्रवासी करापोटी २ ते ५ रुपयांपर्यंतचा अतिरिक्त अधिभार वसूल केला जातो. मात्र, हा भुर्दंड सोसूनही प्रवाशांना दुर्गंधीयुक्त स्वच्छतागृहे आणि अस्वच्छ परिसराचाच सामना करावा लागत आहे. वारंवार इशारे देऊनही एकाही जबाबदार आगार प्रमुख अथवा ठेकेदारावर पाठराखण होते. स्थानिक प्रशासन मंत्र्यांच्या इशाऱ्यांना केराची टोपली दाखवत असल्याची भावना प्रवाशांमध्ये निर्माण झाली आहे.
‘एसटी कर्मचाऱ्यांचा पगार जमा; बोनसचा निर्णय दोन दिवसांत’
एसटी कर्मचाऱ्यांच्या दिवाळीबाबत बोलताना सरनाईक म्हणाले, “कर्मचाऱ्यांचे वेतन दिवाळीपूर्वीच देण्याचा निर्णय घेतला होता आणि कालपासून सर्वांच्या खात्यात पगार जमा झाला आहे. कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासंदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आली असून पुढील दोन दिवसांत यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल.”
‘पुर्णेकर हत्येचे राजकारण करू नका; शेतकऱ्यांची अडवणूक खपवून घेणार नाही’
लोकशाहीत सर्वांना न्यायाचा अधिकार आहे. या प्रकरणातील आरोपींना भर चौकात फाशी झाली पाहिजे, ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आणि आमची पहिल्या दिवसापासून भूमिका आहे. पुर्णेकर कुटुंबीयांना सर्व कायदेशीर मदत स्वखर्चाने देण्यास मी कटिबद्ध आहे. विरोधकांनी दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून या हत्येचे राजकीय भांडवल करू नये,” असा इशारा सरनाईक यांनी दिला. महायुती सरकार शेतकऱ्यांच्या ठाम पाठीशी असल्याचे सांगत, “मायक्रोफायनान्स कंपन्यांनी शेतकऱ्यांना घरादारापासून वंचित ठेवल्यास गाठ आमच्याशी आहे. शिवसैनिकांनी कायदा हातात घेतल्यास आम्हाला दोष देऊ नका,” असा इशारा त्यांनी दिला. शिवसेना पक्षचिन्हाबाबत न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणावर, “सर्वोच्च न्यायालयाचा जो काही निकाल येईल, तो आम्हाला पूर्णपणे मान्य असेल,” असेही त्यांनी सांगितले.
