सोलापूर : सोलापुरात वेगवेगळ्या भागातील बाजारपेठांमध्ये सराफी दुकानांमध्ये हातचलाखीने सोने-चांदीचे दागिने लांबविणाऱ्या चार बुरखाधारी महिलांचा शोध घेण्यास पोलिसांना यश आले आहे. यात एका वृद्धेसह चारही महिलांनी गेल्या महिनाभरात वेगवेगळ्या सात सराफी दुकानांमधून दागिने चोरून नेले होते.

गौराबाई जाधव (वय ७५), संगीता जाधव (वय ४५), मंजुश्री जाधव (वय ४०) आणि राणी गायकवाड (वय ३५, सर्व रा. रामवाडी, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या टोळीतील महिलांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख ९५ हजार रुपये किंमतीचे सोने-चांदीचे चोरलेले दागिने तसेच तीन बुरखे हस्तगत करण्यात आले आहेत.

हेही वाचा – खासदार विशाल पाटील यांचा कॉंग्रेसला पाठिंबा

गेल्या महिनाभरात शहरातील वेगवेगळ्या तीन सराफी बाजारांमध्ये सात सराफी दुकानांमध्ये ग्राहक बनून, बुरख्याआड चोरी करून पसार होणाऱ्या या महिलांच्या टोळीमुळे सराफ व्यावसायिक हैराण झाले होते. न्यू पाच्छा पेठेत भारतरत्न इंदिरानगरात शिवकुमार ज्वेलर्स, सिद्धेश्वर पेठेतील विजापूर वेशीत, मक्का मशिदीजवळ आसीफ बशीर शेख यांचे सराफी दुकान, अशोक चौकातील राजेश ज्वेलर्स यांसह विविध भागातील सात सराफी दुकानात या टोळीने दागिने चोरल्याचे तपासात आढळून आले.

हेही वाचा – सोलापुरात पावसाळी वातावरणामुळे खरीप पेरण्यांसाठी शेतकऱ्यांचा उत्साह

बुरखा पांघरलेल्या या चार महिला सराफी दुकानात सोने-चांदीचे दागिने खरेदी करण्याच्या निमित्ताने जायच्या. दुकानातील मालक आणि नोकरांचे लक्ष विचलित करून बेमालूमपणे सोन्याच्या अंगठ्या, कर्णफुले, चांदीचे पैंजण, जोडवे आदी दागिने लंपास करायच्या. याबाबत पोलिसांत गुन्हे दाखल झाल्यानंतर या बुरखाधारी महिलांच्या टोळीचा शोध घेण्यासाठी पोलीस सतर्क झाले. अखेर यात ही टोळी पोलिसांच्या हाती लागली.