सोलापूर : वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाला विरोध केल्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिमा फाडून आंदोलन करणाऱ्या सात कथित शिवसैनिकांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ओंकार राजेश चव्हाण, विशाल पवार, अभिषेक चव्हाण, सोनू चव्हाण यांच्यासह इतरांविरुध्द फौजदार चावडी पोलीस ठाण्यात जमावबंदी कायद्याचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे कथित शहर उपप्रमुख ओंकार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चार हुतात्मा पुतळ्याजवळ वक्त बोर्ड सुधारणा विधेयकाला पक्षाने विरोध केल्याबद्दल निषेध नोंदविण्यात आला. त्याची प्रतिक्रिया म्हणून उद्धव ठाकरे यांची प्रतिमा फाडण्यात आली. पोलीस आयुक्तालयाने शहरात जमावबंदीसह सभाबंदीचा आदेश जारी केला असताना त्याचे उल्लंघन केल्याचा ठपका आंदोलकांवर ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, या आंदोलनात उद्धव ठाकरे यांची प्रतिमा फाडली गेल्याचे समजताच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, दत्तोपंत वानकर आदींच्या शिष्टमंडळाने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन ओंकार चव्हाण आणि इतरांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. चव्हाण यांची यापूर्वीच पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, असा दावा जिल्हाप्रमुख प्रा. दासरी यांनी केला आहे.