सोलापूर : एरवी मे महिन्याच्या तप्त उन्हाळ्यात सोलापूर जिल्ह्यात उजनी धरणातील पाणीसाठा रसातळाला जातो. धरणातून पाणी मिळणे कठीण होते. परंतु यंदा प्रथमच वळवाच्या जोरदार पावसामुळे धरणात एकाच दिवशी दोन टक्के म्हणजे एक टीएमसी पाणी वधारले आहे. धरणाच्या इतिहासात मे महिन्यात पाणी फस्त होण्याऐवजी वधारत असल्याचे सुखद चित्र प्रथमच पाहायला मिळत आहे. जोरदार पावसाबरोबरच तापमानात मोठी घट झाल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही कमी झाल्यामुळे ही वाढ दिसत आहे.

एकूण १२३ टीएमसी एवढ्या प्रचंड क्षमतेच्या उजनी धरणात गतवर्षी शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. परंतु राजकीय दांडगाई करून हे पाणी पळविले जाते. त्यामुळे संपूर्ण पाणीसाठा वर्षभरही पुरत नाही. यंदा अवघ्या चार महिन्यांत धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीपर्यंत बाब फस्त झाला आहे. सध्या केवळ ५३ टीएमसी तोसुद्धा मृत पातळीत राहिला आहे. मृत पातळीतील १०.८१ टीएमसी पाणीसाठा वापरण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर चालू उन्हाळ्यात मे महिन्यात धरणातील पाणीसाठ्याची स्थिती शोचनीय असताना सुदैवाने गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या वळवाने उजनी धरणाला आधार मिळाला आहे. मेसारख्या अतिशय कडक उन्हाळ्यात धरणाच्या परिसरात एकाच वेळी ४४ मिमी पाऊस पडला. परिणामी धरणात एकाच दिवशी दोन टक्के म्हणजे एक टीएमसी पाणीसाठा वाढल्याचे प्रथमच पाहायला मिळत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धरणाच्या परिसरात मागील काही दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे धरणात येऊन मिसळणारे पाणी वाढत आहे. त्यातच तापमानात मोठी घट झाल्याने धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही कमी झाले आहे. सध्या ४५०० क्युसेक प्रवाहाने धरणात पाणी मिसळत आहे. वळवाचा पाऊस थांबल्यास या पाण्याचा विसर्गही थांबू शकतो.