सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बहुप्रतिक्षित २२ व्या युवा महोत्सवाची रणधुमाळी यंदा बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयात रंगणार आहे. तब्बल १४ वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर ‘भगवंत नगरी’त पुन्हा एकदा हा युवा महोत्सव साजरा होणार असल्याने सोलापूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन तरुणाईमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. येत्या सप्टेंबरच्या अखेरीस किंवा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या कलाकुंभाचा पडदा उघडण्याची शक्यता असून लवकरच अधिकृत तारखांची घोषणा होणार आहे.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागामार्फत दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या यजमानपदाचा मान कोणाला मिळणार, याबद्दल खल सुरू असताना बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाने पुढाकार घेत सकारात्मकता दर्शवली आणि यजमानपदावर मोहर उमटवली. यापूर्वी २०१२ मध्ये या महाविद्यालयाने युवा महोत्सवाचे यशस्वी आयोजन केले होते. महोत्सवाचे यजमानपद निश्चित झाल्याने आता विद्यार्थ्यांच्या तयारीसाठी पुरेसा वेळ मिळणार आहे.

विद्यापीठाशी संलग्न असलेल्या ११७ महाविद्यालयांमधील दोन हजारांहून अधिक कलाकार-विद्यार्थी या महोत्सवात आपल्या कलेचा जलवा दाखवणार आहेत. विशेष म्हणजे, आतापर्यंत झालेल्या २१ महोत्सवांपैकी सर्वाधिक १६ वेळा सर्वसाधारण विजेतेपद (जनरल चॅम्पियनशिप) पटकावण्याचा विक्रम याच श्री शिवाजी महाविद्यालयाच्या नावावर आहे; तर चार वेळा त्यांनी उपविजेतेपद मिळवले आहे. त्यामुळे स्वतःच्याच घरच्या मैदानात यंदाचा महोत्सव होत असल्याने बार्शीकरांचा उत्साह द्विगुणित झाला आहे.

६ गट अन् ३९ कलाप्रकारांचा थरार

या महोत्सवात संगीत, नृत्य, नाट्य, लोककला आणि ललितकला अशा तब्बल ६ प्रमुख गटांतील ३९ विविध कलाप्रकारांचा थरार रंगणार आहे. राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक कलाप्रकारांचा समावेश करणारे ‘सोलापूर विद्यापीठ’ हे एकमेव विद्यापीठ असल्याचा दावा विद्यार्थी विकास विभागाने केला आहे. पथनाट्य, जलसा, पोवाडा, एकांकिका यांसारख्या विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला येथे नवी दिशा मिळणार आहे. येथील विजेते संघ पुढे आंतरविद्यापीठ आणि राष्ट्रीय पातळीवर विद्यापीठाचा झेंडा फडकवतात. गेल्या चार वर्षांपासून या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर आपली मोहोर उमटवली असून, गेल्या वर्षी आंतरदेशीय महोत्सवात तब्बल २५ कलाप्रकारांत पारितोषिके पटकावण्याची चमकदार कामगिरी केली होती.

विद्यापीठाच्या यंदाच्या युवा महोत्सवाचे यजमानपद बार्शीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाने स्वीकारले आहे. महोत्सवासंदर्भात परिपत्रक लवकरच सर्व महाविद्यालयांना पाठविण्यात येईल. दरवर्षीप्रमाणे यंदाही अत्यंत दर्जेदार आणि शिस्तबद्ध युवा महोत्सव पार पडेल. विद्यार्थ्यांनी आतापासूनच जोमाने तयारीला लागावे.” — डॉ. केदारनाथ काळवणे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग, सोलापूर विद्यापीठ)