सोलापूर : परीक्षा आणि वर्गांच्या चौकटीपलीकडे जाऊन स्वतःमधील कलावंताचा शोध घेण्याची अनावर ओढ… कुठं वर्गाच्या कोपऱ्यात खर्ज लावणारा आवाज, तर कुठं पॅसेजमध्ये घुमणारा घुंगरांचा ठेका; कुठे एकांकिकेतील संवादांची फेरजुळणी, रात्री उशिरापर्यंत रंगलेली नृत्याची ताल… पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या निमित्ताने सध्या जिल्ह्यातील महाविद्यालयीन कट्टे अशाच उत्स्फूर्त सर्जनशीलतेने भारून गेले आहेत. सोलापूर विद्यापीठच्या निखळ कलामहोत्सवाचे यजमानपद यंदा बार्शी येथील श्री शिवाजी महाविद्यालय भूषवत असून, २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत हा युवा कलाकुंभ रंगणार आहे. अवघ्या वीस दिवसांवर आलेल्या या महोत्सवासाठी यजमान महाविद्यालयाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर, प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि कुलसचिव डॉ. अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सवाचे नियोजन आखण्यात आले आहे. विद्यापीठ युवा महोत्सव समितीने नुकतीच बार्शी येथे भेट देऊन नियोजनाची प्रत्यक्ष पाहणी केली. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक केदारनाथ काळवणे यांनी सर्व व्यवस्थेचा सविस्तर आढावा घेत आवश्यक सूचना केल्या.

९ रंगमंचांवर ३९ कलाप्रकारांचा जागर….

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना मोकळी वाट करून देण्यासाठी संगीत, नाट्य, नृत्य, ललित कला आणि साहित्य अशा ३९ विविध कलाप्रकारांचे सादरीकरण होणार आहे. यासाठी महाविद्यालय परिसरात एकाच वेळी तब्बल ९ स्वतंत्र रंगमंचांची उभारणी युद्धपातळीवर सुरू आहे. परतीच्या पावसाची शक्यता गृहीत धरून सर्व रंगमंचांवर वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात येत आहेत. उत्तम ध्वनी-प्रकाशयोजना, हजारो प्रेक्षकांसाठी बैठक व्यवस्था, मुक्कामाची आणि भोजनाची चोख सोय करण्यात येत आहे. पाहणी दौऱ्यात यजमान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. बी. शेख, प्रा. विश्वनाथ आवड, यशपाल खेडकर, राम पवार, गुणवंत सरवदे आदी उपस्थित होते.

कॅम्पसमध्ये सराव; ५५ हून अधिक कॉलेजांची चुरस….

विद्यापीठाच्या प्रतिष्ठेच्या सर्वसाधारण विजेतेपदावर नाव कोरण्यासाठी जिल्ह्यातील ५५ हून अधिक महाविद्यालयांमध्ये सध्या चूरस पाहायला मिळत आहे. बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयाबरोबरच सोलापूरचे संगमेश्वर, वालचंद, दयानंद तसेच सांगोला महाविद्यालय अशा प्रमुख केंद्रांवर सकाळ-संध्याकाळ कसून तालीम सुरू आहे. काही महाविद्यालयांच्या कलाकृतींची अंतिम घडी बसली असून, काहींची लगबग सुरू आहे. पहिल्यांदाच मंचावर पाऊल ठेवणाऱ्या कलावंतांपासून ते अनुभवी विद्यार्थ्यांपर्यंत सर्वच जण आपापल्या सादरीकरणाचा जोरदार सराव करत आहेत.

“हा महोत्सव निव्वळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना अभिव्यक्ती देणारे हक्काचे व्यासपीठ आहे. कलाकारांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून दर्जेदार साऊंड सिस्टिम, स्वतंत्र रंगमंच आणि सुरक्षिततेची चोख व्यवस्था करण्यात येत आहे.”- केदारनाथ काळवणे (संचालक, विद्यार्थी विकास विभाग, सोलापूर विद्यापीठ)

“यंदाचा युवा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी अविस्मरणीय ठरेल. ऐनवेळी पावसाचा कोणताही अडथळा येऊ नये म्हणून वॉटरप्रूफ मंडपांची रचना केली आहे. जिल्ह्यातील सर्व कलावंत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी बार्शी महाविद्यालय पूर्ण ताकदीने सज्ज आहे.”- डॉ. ए. बी. शेख (प्राचार्य, श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी)