सोलापूर : सुमारे ८५० कोटी रुपये खर्चाची बहुप्रतीक्षित उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेची चाचणी यशस्वी झाली असल्यामुळे शहराला आता आठवड्यातून दोन वेळा पाणीपुरवठा होणे शक्य असल्याचे सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले. शहराची जलकुंभ आणि जलवितरण व्यवस्था अद्ययावत झाल्यावर शहरास रोज पाणीपुरवठा शक्य असल्याचेही गोरे यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजन केलेल्या आणि तरीही प्रशासन आणि कंत्राटदाराच्या वादामुळे सुमारे सात वर्षे लटकलेल्या उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजनेचे काम एकदाचे पूर्ण झाले आहे. हैदराबादच्या पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनीने हे अखेर मार्गी लावले आहे.

तथापि, २०३५ साली शहराची लोकसंख्या १७ लाख एवढी गृहीत धरून १७० एमएलडी क्षमतेची उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी योजना हाती घेण्यात आली. उशिरा का होईना अखेर ही योजना पूर्ण होऊन त्यांची चाचणीही यशस्वी झाली आहे. त्यानंतर गोरे यांनी या योजनेची सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्रात जाऊन पाहणी केली. सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र जुने आणि टाकळी बंधारा येथून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेसाठी कार्यरत आहे. यापूर्वीच्या उजनी सोलापूर एकेरी जलवाहिनी योजनेसाठी पाकणी येथे अस्तित्वात आहे. त्यालाच लगत समांतर जलवाहिनी योजनेसाठी नवे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव आहे. परंतु, ती जागा वनखात्याची असल्यामुळे कायदेशीर अडचण होती. ही अडचण शेवटच्या क्षणी सोडविण्यात आली आहे. त्यामुळे तेथे नवे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी वेळ लागणार आहे. तोपर्यंत सोरेगाव येथील जलशुद्धीकरण केंद्रात नव्या समांतर जलवाहिनीचे पाणी वळविण्यात आले आहे.

याशिवाय शहरातील जलवितरण व्यवस्था जुनी आहे. तसेच नवीन जलकुंभ उभारण्यात आले नाहीत. त्यासाठी सुमारे ८५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यासाठीचा निधी मंजूर होण्याकरिता आणि प्रत्यक्षात नवीन जलवितरणासह वाढीव जलकुंभ उभारण्याच्या कामाला आणखी काही वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे. तोपर्यंत शहरात तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणे शक्य आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोलापूरकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण

उजनी-सोलापूर समांतर जलवाहिनी एकदा पूर्ण झाल्यानंतर येत्या काही काळात शहरातील अंतर्गत जलवितरण व्यवस्था परिपूर्ण आणि मजबूत होण्यासाठी शासनाने ८५० कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे शहराला दररोज पाणीपुरवठा होण्याचे सोलापूरकरांचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागणार आहे. – जयकुमार गोरे, पालकमंत्री, सोलापूर