पंढरपूर : सोलापूर शहराच्या तापमानात पुन्हा वाढ झाली आहे. सोलापूरचा पारा ४१.६ अंश सेल्सियस इतके नोंद झाले आहे. त्यामुळे उन्हाचे चटके आता खऱ्या अर्थाने सोसावे लागणार आहेत. ११ एप्रिलच्या तुलनेत १२ एप्रिल रोजी तापमानात तब्बल ०.२ अंशांची लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे. यामुळे शहरात दुपारच्या वेळी शहरात जणू ‘अघोषित संचारबंदी’असल्यासारखा शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
सोलापूर शहरात तापमानात वाढ होत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा चटका अधिकच तीव्र होत आहे. कमाल तापमान ४१.६ अं. सेल्सियस तर किमान तापमान २६.६ अंश सेल्सियस नोंद झाली आहे. कोरडे हवामान आणि कडक उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. हवेतील आर्द्रता घटल्याने उन्हाचा चटका अधिक तीव्र जाणवत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, एप्रिलचा मध्य जवळ येत असताना सूर्याची प्रखरता आणखी वाढणार आहे. १० मार्च रोजी तापमानात मोठी वाढ झाल्यानंतर मध्यंतरी काही दिवस किंचित दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारचे तापमान ४१.६ अंशांच्या नोंदीने पुन्हा एकदा उन्हाचा त्रास वाढला आहे.
वाढत्या उन्हामुळे दुपारी १२ ते ४ या वेळेत शहरातील मुख्य रस्ते आणि बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे. सोलापूरच्या तापमानाचा हा आलेख पाहता, मे महिना उजाडण्यापूर्वीच शहर राज्याचे ‘हॉटस्पॉट’ ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठिकठिकाणी थंड पेय पिण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. दिवसभर तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या. लिंबू सरबत, ताक किंवा शहाळे पाणी यांसारख्या नैसर्गिक पेयांना प्राधान्य द्या. तसेच कडक उन्हाचा विचार करता दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. जिल्ह्यातील काही तालुक्यांत देखील तापमानाने चाळीशी पार केली आहे. असे असले तरी पुढील काही दिवस तापमानात वाढ होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
