सांगली : शेती उध्दवस्त करणारा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी रविवारी कडेपूर तालुक्यातील नेवरी ते घोगाव पदयात्रा काढण्यात आली. अॅड. दीपक लाड यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या पदयात्रेत तरूण शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते.
शक्तीपीठ महामार्गाचे रेखांकन बदलत असताना पुर्वीचा मार्ग रद्द करून खानापूर, कडेगाव, पलूस, वाळवा तालुक्यातील २९ गावांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. नव्याने रेखांकन केलेल्या गावातून शक्तीपीठ महामार्गात बागायती जमिनींचा समावेश करण्यात आला असून यामुळे शेतकरी वर्गातून या महामार्गाला विरोध होत आहे.
शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्यावतीने कडेगाव तालुक्यातील नेवरी ते पलूस तालुक्यातील घोगाव या मार्गावर आज पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत कार्यकर्ते, शेतकरी सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, जमिन वाचवा या घोषणासह रक्त सांडू पण महामार्ग रोखू अशा घोषणा देणारे फलक होते. पदयात्रेच्या माध्यमातून संभाव्य महामार्गाने बाधित होणार्या गावोगावी जनजागृती केली जात असून या माध्यमातून महामार्गाला विरोध करण्यात येत आहे.
या महामार्गात २९ गावे बाधित होणार असून वाळवा तालुक्यात स्वतंत्रपणे लढा सुरू करण्यात आला असून आता कडेगाव तालुक्यातील शेतकरीही संघटित होउन विरोध करत आहेत. कडेगाव तालुक्यातील नेवरी, आंबेगाव, वडियेरायबाग, वांगी, शिरगाव, देवराष्ट्रे, कुंभारगाव या गावातील शेती बाधित होणार आहे. कोणत्याही स्थितीत हा महामार्ग होउ देणार नाही असा इशारा अॅड. लाड यांनी यावेळी दिला.
