सोलापूर : नांदण्यासाठी सासरी येण्यास टाळाटाळ करून गावातच माहेरी राहणाऱ्या पत्नीचा मारेकऱ्यांना सुपारी देऊन खून केल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील पोंधवडे गावात उजेडात आला. याप्रकरणी पतीसह सहाजणांना करमाळा पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीला घडलेला प्रकार सशस्त्र दरोड्याचा असल्याचे सांगितले जात होते. परंतु पोलीस तपासात श्वान पथकाने मृताच्या पतीच्या घरापर्यंत माग काढून तेथेच घुटमळल्याने घडलेला खरा प्रकार समोर आला.

कोमल बिभीषण मत्रे (वय २३) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तिची आई अलकाबाई सौदागर वाघ हिने दिलेल्या फिर्यादीनुसार मृत कोमल हिचा पती बिभीषण मत्रे व दीर देवीदास मत्रे आणि सलीम सय्यद यांची नावे संशयित आरोपी म्हणून निष्पन्न झाली होती. कसून तपास केला असता खुनाची सुपारी देण्यात आली होती, हे आढळून आले. त्यानुसार बिभीषण मत्रे याच्यासह खुनाची सुपारी घेणारे रोहन प्रदीप मोरे (वय २०, जलालपूर, ता. कर्जत, जि. आहमदनगर), सुनील विष्णू शिंदे (वय ३९), प्रदीप ऊर्फ दीपक सुनील हिरभगत (वय ३२), ऋषिकेश ऊर्फ बच्चन अनिल शिंदे (वय २२, तिघे रा. भांबोरा, ता. कर्जत), विशाल ऊर्फ सोन्या परशुराम सवाणे (वय २३, रा. जाचक वस्ती, इंदापूर, सध्या रा. भांबोरा, ता. कर्जत) या सहाजणांना अटक करण्यात आली आहे. हे सर्वजण पोलीस कोठडीत आहेत.

हेही वाचा – Girish Mahajan : कॅबिनेट बैठकीत निधीवरून अजित पवारांबरोबर खडाजंगी? गिरीश महाजन स्पष्टीकरण देत म्हणाले, “मी माझ्या खात्यासाठी…”

हेही वाचा – Shyam Manav : “सुपारी देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये…”, देवेंद्र फडणवीसांच्या वडिलांचा उल्लेख करून श्याम मानव यांचा पलटवार

मृत कोमल हिचा विवाह तिच्याच गावातील बिभीषण मत्रे याच्याबरोबर २०१७ साली झाला होता. परंतु नंतर कौटुंबिक कारणांवरून सतत वाद-विवाह होत असल्यामुळे कोमल ही तीन वर्षांपासून माहेरी राहात होती. ती सासरी नांदण्यासाठी पुन्हा येण्यास तयार नव्हती. मुलांना भेटण्यासही ती सक्त विरोध करीत होती. यातच तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन बिभीषण याने भांडण काढले होते. त्याबाबतचा खटला न्यायालयात प्रलंबित असून अंतिम टप्प्यात असलेल्या खटल्यात निकाल विरोधात जाण्याची बिभीषणला भीती वाटत होती. यातच पत्नी कोमल ही आपला खून करणार असल्याच्या संशयानेही त्याला पछाडले होते. तिने आपला खून करण्याअगोदर आपणच तिचा खून करणार असल्याचे तो गावात सांगत होता. यातूनच कोमल हिचा तिच्या माहेरी जाऊन कोयत्यांनी वार करून निर्घृण खून केल्याचा प्रकार घडला. करमाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद घुगे हे पुढील तपास करीत आहेत.