एजाज हुसेन मुजावर

सोलापुरात टाळेबंदीचे निर्बंध शिथिल होऊन बाजारपेठा टप्प्या-टप्प्याने सुरू होऊन अर्थगाडा सुरळीत होण्याची आशा पल्लवित झाल्या असल्या तरीही करोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा वाढतच आहे.

एकेकाळी गिरणगाव म्हणून संपूर्ण देशभर परिचित असलेल्या सोलापुरात १९९०-९५ पासून काही अपवाद वगळता नवे पर्यायी उद्योग-व्यवसाय सुरू झाले नाहीत. यंत्रमाग, विडी आणि वस्त्रोद्योग उद्योगावर सोलापूरचा अर्थगाडा टिकून आहे. त्यामुळे अठरापगड जाती-धर्मीयांच्या या शहरात सामान्य गरीब श्रमिकांची संख्या अधिक आहे. बहुतांशी दाटीवाटीच्या गलिच्छ झोपडपट्टय़ांमध्ये अपुऱ्या नागरी सुविधांसह राहणाऱ्या आणि हातावर पोट असलेल्या श्रमिकांनाच करोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. शहराच्या पूर्व आणि दक्षिण भागात करोनाचा फैलाव आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.

सोलापूर परिसरात उच्चशिक्षित तरुणांना रोजगार उपलब्ध होण्यास फारसा वाव नसल्यामुळे इथले बहुसंख्य शिक्षित तरुण नोकरी, व्यवसायासाठी पुणे, मुंबईत जाऊन स्थिरावले आहेत. तर नेहमीच दुष्काळाचे संकट असलेल्या सांगोला, मंगळवेढासारख्या ग्रामीण भागातील बराचसा वर्ग शहरांमध्ये स्थलांतरित झाला आहे. परंतु करोनाचे भयसंकट वाढले आणि वाटय़ाला टाळेबंदी आली. त्यामुळे पुणे-मुंबईतील दोन लाखांपेक्षा व्यक्ती आपापल्या कुटुंबकबिल्यासह गावाकडे परतल्या.

करोना संकट उभे राहिल्यानंतर पहिल्या टप्प्यातच शहरी भागातून गावाकडे परतण्याचे सत्र सुरू झाले. एव्हाना, सोलापुरातही ११ एप्रिलपर्यंत करोनाचा प्रत्यक्ष प्रादुर्भाव झाला नव्हता. त्या वेळी जिल्हा प्रशासन काहीसे गाफील राहिले आणि १२ एप्रिल रोजी शहरात करोनाबाधित पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर पाहता पाहता करोना विषाणूचा शिरकाव पूर्व भागातील झोपडपट्टय़ांमध्ये पसरला. पूर्व भागालाच खेटून असलेल्या दक्षिण भागातही भयावह परिस्थिती निर्माण झाली. एकेका दिवसात कधी रुग्ण शंभरने वाढू लागले तर मृतांचा आकडाही तसाच वेगाने वाढू लागला.

इतर रुग्णांचेही हाल

एकीकडे करोना विषाणूने घातलेले थैमान थांबायला तयार नसताना करोना आणि बिगर करोना रुग्णांचे हाल झाल्याचा अनुभवही प्रत्ययास आला आहे. यात अनेक खासगी डॉक्टर आणि रुग्णालयांची भूमिका रुग्णसेवेच्या दृष्टीने योग्य नव्हती. अखेरीस प्रशासनाने कारवाईचा दंडुका हातात घेतला आणि शहरातील रुग्णसेवा काही प्रमाणात का होईना सुरळीत झाली आहे. मात्र खासगी रुग्णालये आणि खासगी डॉक्टरांनी आपण रुग्णसेवेचे कर्तव्य करोना संकटात कधीही विसरलो नाही. केवळ खोटेनाटे आरोप करून सोलापूरच्या वैद्यकीय क्षेत्राची परंपरेने उज्ज्वल वारसा जपणारी प्रतिमा मलिन करण्याचा डाव असल्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या सोलापूर शाखेसह खासगी डॉक्टर संघटनेचे म्हणणे आहे. उलट या खासगी डॉक्टर मंडळींनी शासकीय वैद्यकीय यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरही आसूड ओढले आहेत.

करोनाशी लढताना छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयाची कामगिरी  महत्त्वाची ठरली आहे. या रुग्णालयावर करोना आणि बिगरकरोना रुग्णांचा मोठा भार पडला आहे. सध्या हा भार काही प्रमाणात हलका झाला आहे. शहर व ग्रामीण भागात करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू झालेली टाळेबंदी आता बऱ्यापैकी शिथिल झाली आहे. मात्र सुमारे ७० हजार महिला कामगारांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असलेला विडी उद्योग सुरू झाला नाही. यंत्रमाग व कापड उद्योगही पूर्णत: सुरू होण्यास अडचणी आहेत. या तिन्ही उद्योगांमध्ये काम करणाऱ्या बहुतांशी कामगार करोना विषाणू फैलाव असलेल्या आणि प्रतिबंधित क्षेत्रांत झोपडपट्टय़ांमध्ये राहणारे आहेत. यामुळे प्रशासनाची पंचाईत झाली आहे.

ग्रामीण भागात खबरदारी गरजेची

आजमितीला रुग्णसंख्या १३००चा आकडा पार करून पुढे गेली आहे, तर मृतांची संख्या १२५च्या आसपास गेली आहे. राज्यातील अन्य करोनाग्रस्त शहरांच्या तुलनेत सोलापुरातील करोना बळींची संख्या जास्त आणि चिंता वाढविणारी आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात आतापर्यंत करोना विषाणूचा फैलाव सुदैवाने अत्यल्प आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील रुग्णांची टक्केवारी केवळ सहा टक्के एवढी अल्प आहे. तर तब्बल ९४ टक्के रुग्ण शहरातील आहेत. तरीही ग्रामीण भागाकडे आणखी गांभीर्याने लक्ष देण्याची आणि जागरूक राहण्याची गरज वाटते आहे. पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट, अकलूज आदी सततची वर्दळ असलेली शहरे-गावे असुरक्षित राहणार नाहीत, या दृष्टीने खबरदारी घ्यावी लागणार आहे.