दहिगाव जिल्हा परिषद गटातून राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी विजय मिळवत उत्तमराव जानकर यांच्या मुलाचा पराभव केला. पत्नीच्या या विजयामुळे सातपुते गटात उत्साहाचे वातावरण असून राम सातपुते यांनी शड्डू ठोकत जल्लोष केला. दुसरीकडे अर्जुनसिंह मोहिते पाटील यांना गुरसाळे पंचायत समिती गणातून पराभव पत्करावा लागला. मात्र, फुलशेरी जिल्हा परिषद गटातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला आहे.
माळशिरस तालुक्यात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) अशी लढत पाहायला मिळाली. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या विरोधात भाजपचे नेते व पालकमंत्री जयकुमार गोरे आणि माजी आमदार राम सातपुते यांच्यात ही लढत प्रतिष्ठेची ठरली.
मोहिते पाटलांवर टीका
पत्नी संस्कृती सातपुते यांच्या विजयानंतर राम सातपुते यांनी दंड थोपटत शड्डू ठोकला आणि घणाघाती प्रतिक्रिया दिली. “भाजपचा सुफडा साफ करणारी अवलाद अजून जन्माला यायची आहे,” अशी टीका करत त्यांनी मोहिते पाटील घराण्यावर निशाणा साधला.
तीन पराभवानंतर विजय
माळशिरस तालुक्यात यंदा मोठी चुरस पाहायला मिळाली. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत पालकमंत्री जयकुमार गोरे आणि भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. गेल्या तीन निवडणुकांमध्ये सातपुतेंना पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामध्ये लोकसभा, विधानसभा आणि अकलुज नगरपरिषदेत भाजपाचा पराभव झाला होता. आता जिल्हा परिषदेतील विजयानंतर राम सातपुतेंनी शड्डू ठोकून जल्लोष केला.
जीवन जानकरांचा पराभव
जिल्हा परिषद निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामध्ये माळशिरस तालुक्यात सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते आणि विद्यमान आमदार उत्तमराव यांचे चिरंजीव जीवन जानकर यांच्यातील लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. या लढतीत संस्कृती सातपुते यांनी जीवन जानकर यांचा पराभव केला आहे. त्याचबरोबर भाजपच्या उमेदवाराने मोहिते पाटील घराण्यातील अर्जुनसिंह मोहिते पाटील यांचा गुरसाळे गणातून पंचायत समितीत पराभव केला आहे.
माळशिरस तालुक्यात मोहिते-पाटलांचे वर्चस्व कायम पण भाजपलाही मिळाले दोन गट
माळशिरस तालुक्यातील ९ गटांपैकी ७ गटामध्ये मोहिते-पाटलांचे वर्चस्व राहिले आहे. तर दहिगाव आणि पिलीव या दोन गटात भाजपचे उमेदवार निवडून आले आहे. भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी आमदारपुत्र जीवन जानकर यांचा पराभव केला आहे. तर अर्जुनसिंह मोहिते पाटील हे फोंडशिरस गटात जिंकले आणि गुरसाळे गणात हरले आहेत. त्यांच्या पत्नी वैष्णवीदेवी याही विजयी झाल्या आहेत.

