शीतगृहाच्या प्रयोगानंतर आता खवाभट्टय़ांसाठी सौरऊर्जा!

२० इंडक्शन यंत्रांसाठी ५०० वॅटचा प्रकल्प

(संग्रहित छायाचित्र)

सुहास सरदेशमुख

राज्यातील पेढय़ांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या कुंथलगिरी येथे खवा निर्मितीचे समूह केंद्र निर्माण करत आता या भागात सौर ऊर्जेवर खवा निर्मिती प्रक्रिया उद्योग हाती घेण्यात आला आहे. या नव्या प्रकल्पामुळे भूम तालुक्यातील २५० हून अधिक भट्टयांसाठी होणारी तीन लाखाहून अधिक वृक्षाची कत्तल थांबणार आहे. ५०० वॅट सौर प्रणालीवर २० इंडक्शन खवा यंत्रे तयार करण्यासाठी आयसीआयसी बँकेने सामाजिक दायित्व निधीतून साडेतीन कोटी रुपये दिले आहेत. नीती आयोगाकडून या प्रकल्पाला प्रोत्साहन दिले जात आहे. उस्मानाबाद या अतिमागास जिल्ह्यत ‘आकांक्षित जिल्हा’ म्हणून सुरू असणाऱ्या विविध योजनांमध्ये हा प्रकल्प  महत्त्वपूर्ण मानला आहे.

सौरऊर्जेवर आधारित इंडक्शनवर खवा निर्मिती केल्यास पर्यावरण तर जपले जाईलच, शिवाय खव्याचा रंग आणि स्वच्छतेबाबतच्या अनेक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवणे सहज सोपे होईल, असा दावा या प्रकल्पाचे प्रमुख विनोद जोगदंड यांनी केला आहे. कमी वेळात दुधापासून खवा निर्मिती करण्यासाठी विविध प्रकारच्या सौरपटलाच्या आधारे किती ऊर्जा लागू शकते याचा अभ्यास गेल्या तीन वर्षांपासून केला जात आहे.

भूम, वाशी, कळंब, परंडा या सतत दुष्काळग्रस्त भागात दुधावर अवलंबून असणाऱ्या १७ हजाराहून अधिक जणांच्या अर्थकारणात मोठा फरक पडू शकेल, असे सांगण्यात येत आहे. खवा समूह केंद्रातील शीतगृहासाठी आता सौरऊर्जा वापरली जात असून दिवाळीनंतर हा प्रकल्प अंमलबजावणीमध्ये येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पासाठी मदत करण्याचे ठरविले आहे. जिल्ह्यतील  विनोद जोगदंड व रियाज पिरजादे यांनी नोकरी सोडून निर्मल मिल्क प्रोडक्ट्स असोसिएशन या कंपनीमार्फत हा प्रकल्प हाती घेतला आहे. सध्या भूम तालुक्यातील  खवा सामूहिक सुविधा केंद्रातील सुविधांचा २५०  खवा व्यावसायिक – शेतकरी लाभ घेत आहेत. इलेक्ट्रिक भट्टीसाठीचे  वीजदर परवडणारे नसल्याने सौरऊर्जेवर भट्टी उभारण्याचे तंत्र अवलंबण्यात येणार आहे. सर्वसाधारणपणे उस्मानाबाद जिल्ह्यत ३३१ दिवस स्वच्छ सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे खवा निर्मितीत अडचणी येणार नाहीत, असा दावा केला जात आहे.

सध्या काय सुरू आहे?

भूम येथील खवा क्लस्टरमध्ये सध्या सौर प्रणालीवर एक हजार टन क्षमतेचे  शीतगृह सुरू आहे. या शीतगृहासाठी जिल्हा वार्षिक आराखडय़ातून ६२ कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने दिला होता. त्यासाठी १००किलोवॅटच्या सौर प्रकल्पातून  ५०० युनिट वीज लागणाऱ्या या प्रकल्पातून अधिक वीज निमिर्ती झाली तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीला दिली जाते. आणि रात्रीवेळीची वीज महावितरणकडून घेतली जाते.

काय होणार आहे?

५०० सोलर सिस्टम द्वारे २० इंडक्शन खवा यंत्रे विकसित केली जाणार आहेत. टाळेबंदीच्या काळात येथील शीतगृहात २०० टन खवा साठवणूक झाली आहे. त्यावर खवा उत्पादकांना ७५ टक्के रक्कम बँकेकडून माल तारण रूपाच्या मिळण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत.

सौर ऊर्जा निर्मितीच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार होणारा सर्व खवा व पेढा हा देशात प्रथमच एकाच नावाने ब्रॅन्डिंग व पॅकेजिंग करून स्वच्छ  व शुद्ध स्वरुपात ग्राहकांना विक्री केला जाणार आहे. तसेच खव्यापासूनचे सर्व मूल्यवर्धित पदार्ध तयार करून ग्राहकांना उपलब्ध केले जाणार आहेत.

-विनोद जोगदंड, अध्यक्ष, खवा समूह उद्योग

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Solar energy for khava kilns now after cold storage experiment abn