जम्मू-काश्मीरच्या यंत्रणेकडून माहिती; लष्करी गुप्तचर व पोलिसांची संयुक्त कारवाई

लष्कराचा गुप्तचर विभाग व पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने नगर शहरालगत संयुक्त कारवाई करत भरतीसह विविध मार्गाने युवकांची फसवणूक करणाऱ्या बडतर्फ सैनिकाला अटक केली.

प्रशांत भाऊराव पाटील (३२, सध्या रा. दत्तनगर,  डेअरी चौक, एमआयडीसी, नगर, मूळ रा. रवळनाथ मार्ग, कुकतागिरी, खानापूर, बेळगाव, कर्नाटक) असे अटक केलेल्या बडतर्फ जवानाचे नाव आहे. त्याला आज, शनिवारी एमआयडीसी न्यायालयाने पाटील याला दि. २४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.

लष्करी गुप्तचर विभागाच्या जम्मू-काश्मीरमधील यंत्रणेने नगरचे जिल्हा पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांना व लष्कराच्या स्थानिक गुप्तचर विभागाला याची माहिती दिली. त्यानंतर काल, शुक्रवारी संयुक्त रीत्या एमआयडीसीमध्ये ही कारवाई करण्यात आली.प्रशांत पाटील हा सन २००९ मध्ये लष्करात भरती झाला.आसाम रायफल रेजिमेंटमध्ये त्याला नियुक्ती देण्यात आली होती. परंतु सन  २०१४ मध्ये तो रजेवरून पुन्हा रेजिमेंटमध्ये दाखल झाला नाही. बडतर्फीनंतर त्याने लष्कराचा गणवेश घालून फसवणुकीचा उद्योग सुरू केला. त्याच्याविरुद्ध पुण्यामधील बंडगार्डन व वाकड पोलीस ठाण्यांमध्ये फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

नगर येथे एक व्यक्ती सैन्यदलात नोकरीस नसतानाही सैन्यदलाचा गणवेश घालून, बनावट ओळखपत्र तयार करून, स्वत:च्या बलेनो गाडी ( एमएच १० सीएक्स ६९७५) ऑन आर्मी डय़ुटी असा फलक लावून संशयास्पद रीत्या फिरत आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरमधील गुप्तचर यंत्रणेला मिळाली होती.

विविध यांचे आठ गणवेश जप्त

प्रशांत पाटील याला आसाम रेजिमेंटमधून बडतर्फ करण्यात आल्यानंतर तो पुण्यात आला. लष्करात गणवेश व बनावट ओळखपत्राच्या आधारे त्यांनी फसवणुकीचे उद्योग सुरू केले. पुण्यात गुन्हे दाखल झाल्याने तो चार महिन्यांपूर्वी नगरला आला व केडगाव उपनगरात खोली भाडय़ाने घेऊन राहू लागला. तिथेही त्याने बनवेगिरी सुरू केली होती. त्याच्याकडून लष्कराच्या विविध हुद्दय़ांवरील अधिकाऱ्यांची ओळख असणारे आठ गणवेश जप्त केले आहेत.

नोकर भरतीचे अर्ज

बडतर्फ जवान पाटील याची कार व दत्तनगरमधील खोलीच्या झडतीत विविध गणवेशासह विविध पदांच्या फिती, ओळखपत्रे व चिन्हे, नेमप्लेट, शिक्के आढळले. विशेष म्हणजे लष्कर भरतीच्या अर्जांचा गठ्ठा  तेथे होता. या अर्जांवर किमान १० ते १२ युवकांची छायाचित्रे चिटकवली गेली होती. वेगवेगळ्या बँकांची १४ पासबुक, ७ चेकबुक, ५ मोबाइल पोलिसांनी जप्त केले आहे. त्याच्या कारला पाठीमागे व पुढे दोन वेगवेगळे क्रमांक व लष्कराची चिन्हेही लावली होती. तसेच आसाम रायफल ट्रेनिंग सेंटर स्कूलचे मेजर ए. के. नायर यांच्या सहीचे परसराम भाऊराव पाटील या नावाचे हंगामी नेमणूक पत्र , ४६ आसाम रायफल रेजीमेंटचे गैरहजेरीची कारणे दाखवा नोटिस असा एकूण ७ लाख २२ हजार  किमतीचा मुद्देमाल, बनावट कागदपत्रे जप्त करण्यात आली.