-विजय पाटील

जरंडेश्वर साखर कारखान्याच्या खरेदी-विक्रीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत यासंदर्भातील कागदपत्रांची फाईल घेऊन आज (मंगळवार) कारखान्याच्या संचालकांसह सभासदांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांची भेट घेतली असता, ही कागदपत्रे पडताळून येत्या मंगळवारी ५ ऑक्टोंबरला जरंडेश्वर कारखान्याला भेट देऊन पुढे बारामतीलाही जाणार असल्याचे सोमय्या यांनी यावेळी सांगितले. त्यामुळे आता कोल्हापूर पाठोपाठ सातारा आणि पुणे जिल्ह्याातील राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारे भाजपा नेते किरीट सोमय्या कोल्हापूरकडे जात असताना, सातारा येथे थांबले होते. या वेळी त्यांची जरंडेश्वर कारखान्याच्या संचालक, सभासदांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. यानंतर माध्यमांशी बोलताना आपल्याकडे येणारे भ्रष्टाचाराचे प्रत्येक प्रकरण तडीस लावू अशी ग्वाही सोमय्या यांनी दिली.

तसेच, ”राज्य सरकारने स्वत:ची अब्रू वाचवण्यासाठी आपल्यावरील कोल्हपूर जिल्हा बंदी उठवली. खरेतर या बंदीला मी जुमानत नसतो. ठाकरे, पवारांना माझे आव्हान असेल की त्यांनी मला अडवून दाखवावे.” असं देखील सोमय्या यांनी यावेळी बोलून दाखवले.

दरम्यान, सोमय्या कोल्हापूरकडे जाताना त्यांचे उंब्रज व मलकापूर येथे भाजप कार्यकत्र्यांनी स्वागत केले. यावेळी सोमय्या यांनी आपण कोल्हापूरच्या अंबामाईचे दर्शन घेऊन भ्रष्टाचाररूपी राक्षस संपवण्याची प्रार्थना करणार असून, भ्रष्टाचार विरोधी लढ्यासाठी देवीकडे शक्ती मागणार असल्याचे सांगितले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कराड शहराध्यक्ष एकनाथ बागडी, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, रामकृष्ण वेताळ आदी उपस्थित होते.