scorecardresearch

“कदाचित कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी आमच्या इथले काही जिल्हे …” – आदित्य ठाकरेंचं विधान!

“दु:ख हेच आहे की प्रत्येक वेळी महाराष्ट्राला यातना होतात, मात्र कोणाला वाईट वाटत नाही.” असंही आदित्य ठाकरेंनी यावेळी म्हटलं आहे.

“कदाचित कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी आमच्या इथले काही जिल्हे …” – आदित्य ठाकरेंचं विधान!
(संग्रहित छायाचित्र)

महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्नावरून दोन्ही राज्यांमध्ये निर्माण झालेल्या कटुतेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आयोजित केलेल्या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे उपस्थित राहणार आहेत.

दोन आठवडय़ांपूर्वी सीमा प्रश्नावरून हिंसक प्रतिक्रिया उमटली होती. सीमा भागात राज्याच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली होती. त्याची राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूर, अक्कलकोट, जतसह काही भागांवर दावा केला होता. त्यावरून राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री कुरापती काढत असताना शिंदे -फडणवीस सरकारने कोणतीही आक्रमक भूमिका घेतली नाही, असा आरोप करीत विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरले होते.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निवडणुकांमुळे होतोय का? असा सवाल शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी केला आहे. याशिवाय बैठकीतून सीमावादावर तोडगा निघेल, अशी अपेक्षा असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटलं की, “ अपेक्षा तर आहे की तोडगा निघेल, जो काही वादविवाद आहे तो आपल्याच देशातील दोन राज्यांमध्ये आहे. असे वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात सुरू आहेत, तसेच काही सुरू आहेत आणि काही निकाली निघाले आहेत. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांकडून जो आक्रमकपण दिसत आहे, तो कदाचित निवडणुकीसाठी असू शकतो. जसं गुजरात निवडणुकीसाठी आमच्या इथले काही प्रकल्प तिकडे नेले. त्याचप्रकारे कदाचित कर्नाटकाच्या निवडणुकीसाठी आमच्या इथले काही जिल्हे तिकडे नेले जाऊ शकतात. दु:ख हेच आहे की प्रत्येक वेळी महाराष्ट्राला यातना होतात, मात्र कोणाला वाईट वाटत नाही. ”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-12-2022 at 19:57 IST

संबंधित बातम्या