मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतला आहे. तसा प्रस्ताव मंत्रिमंडळानं राज्यपालांकडे पाठवला आहे. मात्र हा प्रस्तावच बेकायशीर असल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. “आमदारकीच्या पेचप्रसंगातून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागावा, हे आघाडीतल्याच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे. त्यात आम्हाला बोट कशाला लावता,” असा गौप्यस्फोट पाटील यांनी केला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,”उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद आमदारकीचा महाविकास आघाडीनं राज्यपालांकडे पाठवलेला प्रस्ताव बेकायदेशीर आहे. त्यात आम्ही कशासाठी पुढाकार घ्यायचा. आमदारकीचा पेचप्रसंग निर्माण होऊन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल, हे महाविकास आघाडीतीलच काही असंतुष्ट नेत्यांचं प्लॅनिंग आहे. त्यात आम्हाला कशाला बोट लावता?,” असा धक्कादायक खुलासा पाटील यांनी केला आहे.

आणखी वाचा- “महसुलासाठी वाईन शाॅपचा विचार करा”; राज ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला

पीएम केअर फंडाला मदत करण्याचं आवाहन केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्याविषयी बोलताना पाटील म्हणाले,”आम्ही भाडोत्री ट्रोलर्सला घाबरत नाहीत. माझ्या ट्विटमुळेच १४ जिल्ह्यामध्ये पालकमंत्री गेले. हे माझं यश आहे. पुण्यातील एका बिल्डर्सच्या ऑफिसमधून ट्रोलिंग होतं आहे. त्याचबरोबर परप्रांतीय मजुरांना महामंडळाच्या बसेसनं त्यांच्या राज्यात सोडावं. प्रत्येक वेळी केंद्राकडं बोट का दाखवता? मुंबईत करोनामुळे गंभीर स्थिती असताना मजुरांचं स्थलांतरण कितपत योग्य आहे. करोना आटोक्यात आणण्यासाठी निमलष्कर, लष्कराला पाचारण करण्यात यावं, अशी आमची सूचना आहे. राज्य सरकारनंही मुख्यमंत्री सहायता निधीतून किती खर्च केला त्याचा हिशोब द्यावा,” अशी मागणीही पाटील यांनी केली.