श्रीवर्धन – सोमनाथ मंदिराचा इतिहास संघर्षाचा राहिला आहे. १०२६ मध्ये गझनीच्या महमूदने मंदिरावर आक्रमण करून तेथील अफाट संपत्ती लुटली होती.हे मंदिर इतिहासात १७ वेळा उद्ध्वस्त करण्यात आले, तरीही ते प्रत्येक वेळी पुन्हा उभारले गेले. १०२६ मध्ये महंमद गझनीने केलेल्या पहिल्या आक्रमणाला २०२६ मध्ये १००० वर्षे पूर्ण झाली आहेत.या निमित्ताने गुजरातच्या सोमनाथ मंदिरात ‘सोमनाथ स्वाभिमान पर्व’ उत्साहात साजरे करण्यात आले.या पर्वात पंतप्रधान नरेंद्र जी मोदी सहभागी झाले होते.असे प्रतिपादन भाजपचे ज्येष्ठ नेते माधव भांडारी यांनी केले.

श्रीवर्धन येथील सार्वजनिक वाचनालय संस्थे तर्फे ” सोरटी सोमनाथ मंदिराचा इतिहास ” या विषयावर पेशवे आळी येथील दत्त मंदिरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्ष मनोज गोगटे , उपाध्यक्ष विनय वैद्य , सहकार्यवाह कुणाल सावंत उपस्थित होते.व्याख्यान दरम्यान , कोकण पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. अशोक मोडक , सेवानिवृत्त शिक्षक आणि सार्वजनिक वाचनालय श्रीवर्धन चे माजी अध्यक्ष बाळकृष्ण पेंडसे आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

यावेळी भांडारी यांनी सांगितले की. सोमनाथ मंदिर हे गुजरातच्या वेरावळ जवळ, प्रभास पाटन येथे असलेल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले आणि अत्यंत पवित्र हिंदू तीर्थक्षेत्र आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे, ज्याचा इतिहास अनेकदा झालेल्या हल्ले आणि पुनर्बांधणीचा साक्षीदार आहे .अठराव्या शतकात उद्ध्वस्त झालेल्या सोमनाथ मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात इंदूरच्या मराठा राणी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा मोलाचा वाटा आहे. १७८३ च्या सुमारास त्यांनी मूळ सोमनाथ मंदिराच्या जवळच एक नवीन मंदिर बांधले, जे आज ‘अहिल्याबाई मंदिर’ किंवा ‘जुने सोमनाथ मंदिर’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरामुळेच सोमनाथ मध्ये पूजा-अर्चा सुरू राहू शकली.सध्याचे मंदिर स्वातंत्र्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने बांधले गेले आहे.

चंद्रदेवाने राजा दक्ष प्रजापतीच्या सत्तावीस कन्यांशी (नक्षत्रांशी) विवाह केला होता.चंद्राने केवळ रोहिणी वरच प्रेम केल्यामुळे रागावून दक्षाने त्याला ‘क्षय’ होण्याचा शाप दिला. या शापातून मुक्त होण्यासाठी चंद्राने येथे शिवाची आराधना केली. भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी चंद्राला पूर्णपणे नष्ट होण्यापासून वाचवून ‘अमरत्व’ दिले, ज्याची आठवण म्हणून सोमनाथ ज्योतिर्लिंगांची स्थापना झाली. याच कारणामुळे या ठिकाणाला ‘सोमनाथ’ असे नाव पडले.अशी महत्वपूर्ण माहिती माधव भांडारी यांनी दिली.

श्रीवर्धन नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष ॲड.अतुल चोगले , उपनगराध्यक्ष अनंत गुरव तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रभावी सुत्रसंचलन पद्मजा कुळकर्णी यांनी केले तर प्रास्ताविक कार्यवाह गणेश सावंत यांनी केले.आभारप्रदर्शन मनोज गोगटे यांनी केले.व्याख्यानास श्रीवर्धन वासीयांनी चांगला प्रतिसाद दिला.